बॉलिवूडमध्ये सध्या #MeToo मोहिमेमुळे खळबळ माजली आहे. लैंगिक गैरवर्तवणुकीचे रोज वेगवेगळे आरोप समोर येत आहेत. विशेष म्हणजे फक्त अभिनेत्री नाही तर अभिनेत्यांनीही आपले अनुभव शेअर केले आहेत. नुकतंच सैफ अली खाननेदेखील आपल्यालाही 25 वर्षांपूर्वी अशा घटनांना सामोरं जावं लागल्याचं म्हटलं आहे.

या यादीत आता अजून एका नावाचा समावेश झाला आहे ते म्हणजे साकिब सलीम याचं. साकिब सलीम याने आपला अनुभव शेअर केला आहे. अभिनेत्री हुमा कुरेशीचा भाऊ साकिब याने कोणाचं नाव घेतलेलं नाही, मात्र एका व्यक्तीने आपल्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला होता असं सांगितलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना साकिबने सांगितलं की, ‘जेव्हा मी 21 वर्षांचा होतो तेव्हा एका व्यक्तीने माझ्याशी लैंगिक गैरवर्तवणूक करण्याचा प्रयत्न केला. त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला होता’.

पुढे त्याने सांगितलं की, ‘इंडस्ट्रीत त्या व्यक्तीचे अनेक समलैंगित मित्र आहेत आणि ते खूप चांगले आहेत’. ‘जेव्हा माझ्यासोबत हे सर्व झालं तेव्हा मी त्याचा हात झटकला आणि कामापुरतं मर्यादित राहा असं सुनावलं आणि तेथून निघून गेलो. या घटनेनंतर मी खूप घाबरलो होतो’, असं साकिबने सांगितलं आहे.

लैंगिक गैरवर्तवणुकीच्या रोज नवनवीन घटना समोर येत असून यावर बोलताना साकिबने सांगितलं की, ‘अशा घटनांबद्दल ऐकलं की वाईट वाटतं. लैंगिक गैरवर्तवणूक करणारे लोक खूप भयानक आहेत’. #MeToo मोहिमेमुळे देशभरात आणि खासकरुन बॉलिवूडमध्ये वादळ आलं आहे. आतापर्यंत अनेक मोठ्या सेलिब्रेटींवर आरोप करण्यात आले असून यामध्ये विकास बहल, साजिद खान, आलोकनाथ, सुभाष घई आणि नाना पाटेकर यांच्या नावाचा समावेश आहे.