#MeToo ही फक्त माझी लढाई नाही, हा महिला विरुद्ध पुरुष असा संघर्षही नाही, हे एक आव्हान आहे. मला न्याय मिळेल अशी खात्री मला आहे. मात्र अशा प्रकारच्या चळवळीतून पुढच्या पिढ्यांनाही न्याय मिळेल असा विश्वास अभिनेत्री तनुश्री दत्ताने व्यक्त केला आहे. आपल्याला ठाऊकच आहे की तनुश्री दत्ताने MeToo या चळवळीद्वारे तिच्यावर झालेल्या अन्यायाला सर्वात पहिल्यांदा वाचा फोडली. दहा वर्षांपूर्वी ‘हॉर्न ओके प्लीज’ या सिनेमाच्या सेटवर अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला. #MeToo या चळवळीत तिने ही व्यथा मांडली. ज्यानंतर हिंदी सिनेसृष्टीतल्या अनेक अभिनेत्री पुढे आल्या आणि त्यांनी त्यांच्यासोबत झालेल्या अन्यायाला वाचा फोडली.

सध्या आपल्या समाजाचे आरोग्य बिघडले आहे, त्याचमुळे महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत. रोजच्या जगण्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागतो आहे. त्यामुळे पुढारलेल्या महिलांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी समाजाची महिलेच्या विरोधात असलेली मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करावा. कदाचित असे होऊही शकते की यामुळे पुढारलेल्या महिलांना त्रास होईल पण तसे झाले तरीही हरकत नाही पण ही मानसिकता बदलली पाहिजे असेही तनुश्री दत्ताने म्हटले आहे. मीटूची चळवळही याचसाठी आहे असेही तिने सांगितले.

मी माझ्यावर अन्याय झाला ते ठामपणे सांगितले. मला दहा वर्षांनी का बोलता असेही प्रश्न विचारण्यात आले मात्र मी माझे म्हणणे मांडणे थांबवले नाही. माझ्या पुढाकाराने समाजातील अनेक स्त्रिया पुढे आल्या आणि त्यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायांना वाचा फोडली ही बाब माझ्यासाठी निश्चितच समाधानकारक आहे असेही तनुश्री दत्ताने म्हटले आहे. लोकमत विमेन समिट २०१८ हा कार्यक्रम पुण्यात पार पडला ज्यामध्ये तिने आपली मतं मांडली आहेत. माझ्यावर झालेल्या अन्यायाला दहा वर्षे झाली असली तरीही तो दिवस आठवला की अंगावर काटा येतो तो माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस होता असेही तनुश्रीने म्हटले आहे.

याचसोबत बॉलिवुड अर्थात हिंदी सिनेसृष्टीतून मला फारसा पाठिंबा मिळाला नाही याची खंतही तनुश्रीने बोलून दाखवली. धाडसाने पुढे येऊन आपले म्हणणे मांडणाऱ्याच्या पाठिशी उभं राहण्यासाठीही एक हिंमत लागते. हिंदी सिनेसृष्टीत अशी हिंमत काही मोजक्याच लोकांकडे आहे. मी जे काही केले त्यामुळे समाजात बदल होईल अशी अपेक्षा मला वाटते आहे. समाजातील पीडित घटक त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवतील असे मला वाटत असल्याचेही तनुश्रीने स्पष्ट केले.