गेल्या काही महिन्यांपूर्वी कलाविश्वामध्ये #MeToo चं वादळ घोंगावलं होतं. या मोहिमेअंतर्गंत अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. यामध्ये काही दिग्गज व्यक्तींवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. यात चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावरदेखील आरोप करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांना मुंबई पोलिसांनी क्लिन चीट दिली आहे.

मॉडेल-अभिनेत्री केट शर्मा हिने घईंविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, ‘पिंकविला’च्या माहितीनुसार पोलिसांना या आरोपांमध्ये तथ्य न आढळल्याचं सांगत ही फाइल बंद केली आहे. केटने काही दिवसापूर्वी घरातल्यांना या तक्रारीमुळे त्रास होत असल्याचं कारण देत तक्रार मागे घेतली होती. यावेळी केटने दिलेल्या उत्तरांमध्ये आणि आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, घई यांनी ६ ऑगस्ट रोजी मला घरी भेटण्यासाठी बोलावलं आणि तेथे असभ्य वर्तन केलं. यावेळी घई यांच्या घरी त्यांच्याव्यतिरिक्त अन्य ५ ते ६ लोक उपस्थित होते असा आरोप केटने केला होता. मात्र तक्रार दाखल केल्यानंतर कुटुंबियांना मानसिक त्रास होत असल्यामुळे तक्रार मागे घेत असल्याचं काही दिवसांपूर्वी केट सांगितलं होतं.