साजिद खान दिग्दर्शित आणि अक्षय कुमार आणि नाना पाटेकर यांची भूमिका असलेल्या ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटातून नाना पाटेकर यांना डच्चू मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, नाना पाटेकर यांना या चित्रपटातून पायउतार व्हावे लागू शकते. तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान गैरवर्तणूक केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मागील काही दिवसांपासून हे प्रकरण चांगलेच पेटले आहे. मात्र आता नानांना चित्रपटामधून बाहेर पडावे लागण्याची आहे. असे झाल्यास नाना पाटेकर यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल. नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्या प्रकरणानंतर अनेक महिलांनी पुढे येत बॉलिवूडमधील सुभाष घई, साजिद खान, अलोक नाथ, कैलाश खेर, पियुष मिश्रा यांसारख्या नामवंतांवरही गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत.

‘हाऊसफुल ४’ चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरु असून चित्रपटात महत्त्वाची भूमिका असणारे नाना पाटेकर आणि दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे आपण या दोघांसोबत काम करणार नाही अशी भूमिका अभिनेता अक्षय कुमारने घेतली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि त्यातच आता नानांना या चित्रपटातून काढणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर साजिद खान यानेही चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या पदावरून काढता पाय घेतला आहे.  एका ट्विटद्वारे त्याने ही माहिती दिली.. ‘माझ्यावर जे काही आरोप होत आहेत ते खोटे असल्याचं मी सिद्ध करेनच. सत्य लोकांना लवकरच कळेल. पण तोपर्यंत माझ्याविषयी कोणतंही मत तयार करून गैरसमज करून घेऊ नका’ असं साजिदनं आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मनोरंजन विश्वात काम करणारी महिला पत्रकार करिश्मा उपाध्याय, अभिनेत्री सलोनी चोप्रा यांनी साजिदवर केलेल्या गंभीर आरोपांची दखल अक्षयनं घेत चित्रीकरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षयनं ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. ‘ मी देशाबाहेर होतो. परतल्यानंतर मला काही अस्वस्थ करून टाकणाऱ्या बातम्या ऐकायला मिळाल्या. म्हणूनच मी ‘हाऊसफुल ४’च्या निर्मात्यांना चित्रीकरण थांबवण्याची विनंती केली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे, त्यामुळे अशा प्रकरणात कडक कारवाई होणं गरजेचं आहे. ज्यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप आहेत त्यांच्यासोबत मी काम करणार नाही. या प्रकरणात ज्या पीडित महिला आहेत त्यांना न्याय मिळालाच पाहिजे’ असं अक्षयनं ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे.