देशभरात सध्या सुरु असलेल्या #metoo या मोहिमेच्या माध्यमातून बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर लैंगिक छळाचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या कलाविश्वामध्ये एकच खळबळ माजल्याचं दिसून येत आहे. आता या मोहिमेअंतर्गत एका ज्येष्ठ पत्रकारावर आरोप करण्यात आले आहेत.  निष्ठा जैन या महिलेने ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

निष्ठा जैनने फेसबुकच्या माध्यमातून विनोद दुआ यांच्यावर आरोप केले असून २९ वर्षापूर्वी विनोद दुआ यांनी लैंगिक शोषण केल्याचं यात म्हटलं आहे. विनोद दुआ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलगी मल्लिका दुआ आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्याविषयी केलेली पोस्ट वाचल्यानंतर ते २९ वर्षापूर्वी माझ्याशी कसे वागले होते हे साऱ्यांसमोर जाहीर करावं यासाठी मी हा निर्णय घेतल्याचं निष्ठा यांनी म्हटलं आहे.

‘२९ वर्षापूर्वी म्हणजे १९८९मध्ये मी नुकतचं माझं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यामुळे नोकरीच्या शोधात असताना मी ‘जनवाणी’ या चॅनेलमध्ये एका मुलाखतीसाठी गेले होते. यावेळी विनोद दुआ माझी मुलाखत घेणार होते. मुलाखतीसाठी मी त्यांच्या केबिनमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी माझं स्वागत केलं. मात्र काही वेळ होत नाही तोच त्यांनी मुलाखत घेण्याऐवजी अश्लील विनोद करण्यास सुरुवात  केली. त्यांचे हे विनोद मला न आवडल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर त्याची नाराजी स्पष्टपणे झळकत होती. त्यानंतर त्यांनी मला वेतनाची अपेक्षा विचारली. मी ५ हजार रुपये असं सांगितल्यानंतर ते प्रचंड संतापले आणि माझी लायकी आहे का  ? असा प्रश्न विचारला. त्यांचं हे वक्तव्य प्रचंड अपमानास्पद होते. खरंतर असा अपमान मी पहिल्यांदाच सहन करत होते’, असं निष्ठा म्हणाल्या.

पुढे त्या असंही म्हणाल्या, ‘हा संपूर्ण प्रकार विसरुन मी अन्य एका ठिकाणी व्हिडिओ एडिटर म्हणून रुजू झाले. विशेष म्हणजे मी कुठे काम करते याची माहिती विनोद दुआ यांनी शोधून काढली आणि तेथे मला त्रास देण्यास सुरुवात केली. अनेक वेळा त्यांनी माझा पाठलाग केला. इतकंच नाही तर एकदा ते मला माझ्या ऑफिसजवळ भेटायला आले. मला वाटलं ते झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागणार असतील परंतु त्यांनी असं न करता त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मी कसंबसं करुन तेथून पळ काढला.

दरम्यान, काही दिवसापूर्वी विनोद दुआ यांनी अक्षय कुमार अक्षयवर नाराजी व्यक्त केली होती. परंतु त्यांनी एकदा स्वत: च्या भूतकाळात जाऊन पाहिले पाहिजे. दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी आपण कसे वागलो आहोत ते पाहणं गरजेचं आहे, असंही त्या म्हणाल्या.

कोण आहे निष्ठा जैन
निष्ठा जैन एक मुक्त पत्रकार असून त्यांनी दिल्लीतील जामिया मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटर येथून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. या व्यतिरिक्त त्यांनी फिल्म अँण्ड टेलीव्हिजन इन्स्टीट्युट येथून पुढील शिक्षण केलं आहे.

कोण आहेत विनोद दुआ

विनोद दुआ हे पत्रकारिता क्षेत्रातील ज्येष्ठ पत्रकार आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक नामांकित चॅनेलमध्ये काम केलं आहे. त्यासोबत सूत्रसंचालक,पॉलिटिकल कमेंटेटर, निवडणूक विश्लेषक या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. विशेष म्हणजे २००८ मध्ये त्यांना पत्रकारितेसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.