जगभरात महिलांवरील अत्याचारांना वाचा फोडणारी MeToo चळवळ अभिनेत्री तनुश्री दत्तामुळे भारतात चर्चेत आली. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. तिने केलेल्या या आरोपांमध्ये काहीही तथ्य निघाले नाही. मात्र MeToo ची चळवळ भारतात धगधगत राहिली आणि अनेक अभिनेत्री, महिला पत्रकार, मॉडेल यांनी त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचारांची वाच्यता केली. सिनेसृष्टीतीलही अनेक व्यक्तीवर लैंगिक छळाचे आरोप झाले. यात एक नाव संगीतकार अनू मलिक यांचंही होतं. हे प्रकरण शांत होत असताना पुन्हा एकदा अनू मलिक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले. प्रसिध्द गायिका सोना मोहापात्रा आणि नेहा भसिन या दोघींनी अनू मलिकवर लैंगिक छळाचा आरोप केला.

सोना मोहापात्रा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ‘इंडियन आयडल ११’मधील स्पर्धकांची स्तुती करणारे एक ट्विट केले. ‘इंडियन आयडल ११’ मधील स्पर्धकांच्या गाण्याने मी भारावून गेलो आहे. राहुल, चेल्सी, दिवास आणि सनी हे चार स्पर्धक वेगवेगळ्या ठिकाणाहून आले आहेत. पण त्यांची संगीताप्रति निष्ठा एकच आहे. असे काही अंशी भावनिक आणि अभिनंदनपर ट्विट सचिनने केले होते.

त्या ट्विटवरून गायिका सोना मोहपात्रा चांगलीच भडकली. “प्रिय सचिन, तुम्हाला अनेक महिला, काही अल्पवयीन मुली यांच्या MeeToo मोहिमेबद्दल माहिती आहे का? गेल्या वर्षी इंडियन आयडल या शो मध्ये परिक्षक असलेले अनु मलिक यांच्या संदर्भात जे काही घडले, ते सगळे सार्वजनिकपणे बाहेर आले होते. यात त्यांच्या आधीच्या निर्मात्यांचाही समावेश होता. त्यांच्याबद्दल कुणाला सहानुभूती वाटत नाही का?, असा सवाल तिने सचिनच्या ट्विटवर उत्तर देत उपस्थित केला.

दरम्यान, अनु मलिक यांच्यावरील आरोपांच्या बातम्यांचे फोटो शेअर करत तिने सोनी टीव्हीला फटकारले आहे. ‘जोपर्यंत निर्भयासारख्या घटना आपल्या देशात घडत नाही, तोपर्यंत लोक जागे होणार नाहीत. अनू मलिक यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे मला माझा शो सोडावा लागला होता. माझ्या आरोपांमुळे अनू मलिक यांच्या कार्यक्रमाला प्रसिद्ध मिळत असल्याचा आरोप माझ्यावर करण्यात आला. या आरोपानंतर वर्षभरताच तो पुन्हा छोट्या पडद्यावर परतला’ असेही ट्विट सोनाने केले आहे.