अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीविरोधात FIR दाखल केली असल्याचं समजत आहे. एका चित्रपटादरम्यान विवेक अग्निहोत्रीनं गरज नसतानाही आपल्याला कपडे उतरवायला सांगितले असा गंभीर आरोप महिन्याभरापूर्वी अभिनेत्री तनुश्रीनं केला होता. विवेक अग्निहोत्रीनं आपल्यावर असलेले गैरवर्तणुकीचे आरोप मान्य केल्यानंतरच तिनं तक्रार दाखल केल्याचं म्हटलं जात आहे.

२००५ मध्ये ‘चॉकलेट : डिप डार्क सिक्रेट’ चित्रीकरणावेळी कोणतीही कल्पना न देता मला संपूर्ण कपडे काढून डान्स करण्यास विवेक अग्निहोत्रीनं सांगितलं. या दृश्यात मी नव्हते तरीही मी अशाप्रकारचा टेक द्यावा अशी सूचना त्यांनी मला केली, असा आरोप तनुश्रीचा होता. मात्र आता तनुश्रीच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार विवेक यांनी आपल्यावरचे आरोप मान्य केले आहे. त्यामुळे ओशिवरा पोलीस स्थानकात तिनं विवेक अग्निहोत्री विरोधात FIR दाखल केली असल्याचं समजत आहे.
तनुश्रीनं यापूर्वी नाना पाटेकर, राकेश सारंग, सामी सिद्धीकी आणि गणेश आचार्य यांच्याविरोधातही तक्रार दाखल केली होती. नाना पाटेकर यांच्यावरही तनुश्रीनं लैंगिक गैरवर्तणुकीसारखे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात नाना पाटेकर यांनी तिला कायदेशीर उत्तर देण्याचं ठरवलं आहे.

एकीकडे तनुश्रीनं ‘चॉकलेट : डिप डार्क सिक्रेट’च्या दिग्दर्शकावर गंभीर आरोप केले असले तरी याच चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शकानं मात्र हे आरोप खोटे असल्याचं सांगितलं आहे. चॉकलेट चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तनुश्रीला कोणीही कपडे काढायला सांगितले नव्हते. तनुश्री माध्यमांना चुकीची माहिती देत असून माध्यमांनीही तिच्या विधानांना प्रसिद्धी देताना विचार केला पाहिजे असं सहाय्यक दिग्दर्शक सत्यजित गझमेर म्हणाले होते. ‘चित्रीकरणादरम्यान तनुश्रीचा गैरसमज झालेला. तिला कोणीही कपडे काढायला सांगितले नव्हते. २०० लोक सेटवर असताना असं सांगण्याची हिंमत तरी कोण करेल का?’, अशी फेसबुक पोस्ट लिहित गझमेर यांनी तनुश्रीचे आरोप तेव्हा फेटाळून लावले होते.