अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातील वादानंतर सुरु झालेल्या #MeToo या मोहिमेने चांगलाच जोर धरला आहे. या मोहिमेअंतर्गंत आतापर्यंत बॉलिवूडसह अन्य क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांची नावं समोर आली आहेत. यामध्येच आता छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीही व्यक्त होऊ लागल्या आहेत. ‘दिल से दिल तक’ या मालिकेतील अभिनेत्री जास्मीन भसीनने तिची metoo स्टोरी शेअर केली आहे.

‘पिंकव्हिला’नुसार, जास्मीनने एका मुलाखतीमध्ये तिची metoo स्टोरी शेअर केली असून यात तिने स्ट्रगल काळातले आलेल्या वाईट अनुभवांचं कथन केलं आहे. ‘करिअर घडविण्यासाठी मुंबईत आल्यानंतर मी अनेक ठिकाणी ऑडिशन दिले होते. त्यातच एका एजन्सीकडून मला एक ठिकाणी ऑडिशन सुरु असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे मी वर्सोव्याला एका दिग्दर्शकाला भेटण्यास गेले.परंतु पहिल्याच भेटीमध्ये दिग्दर्शकाने मला बिकिनीमध्ये पाहण्याची इच्छा असल्याचं म्हटलं’, असं जास्मीनने सांगितलं.

पुढे ती असंही म्हणाली, ‘ऑडिशन सुरु झाल्यावर दिग्दर्शकांनी मला काही औपचारिक प्रश्न विचारले. त्यानंतर चित्रपटामध्ये बिकिनी शूट असल्यामुळे मला आता तुला बिकिनीमध्ये पाहायचं आहे असं सांगितलं. मात्र यावेळी मी चुतराईने या प्रसंगाला सामोरं जात तेथून पळ काढला. त्यानंतर मी माझ्या एजन्सीला फोन करुन डायरेक्टर योग्य नसल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे माझी तक्रार ऐकल्यानंतर एजन्सीने माझी माफी मागत यापुढे त्या दिग्दर्शकाकडे कोणत्याही मुलीला पाठवणार नाही’, असा शब्द दिला.

दरम्यान,’ महिलांवर अत्याचार हा सगळीकडेच होत असतो. फक्त आपण त्यातून मार्ग कसा काढायचा आणि हे प्रकरण कसं हाताळायचं हे मुलींना समजलं पाहिजे. त्यातच एक म्हणजे कोणत्याही व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवणं हे टाळलं पाहिजे, असंही ती म्हणाली. ‘मी टू’वर भाष्य करणाऱ्या जास्मीनने यापूर्वी ‘टशन ए इश्क’, ‘दिल से दिल तक’ अशा मालिकेत प्रमुख भूमिका साकारली असून  यापूर्वी अनेक साऊथ चित्रपटात तिने काम केले आहे.