जुहू येथील व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अभिनेता विद्युत जामवालची वांद्रे येथील दंडाधिकारी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सप्टेंबर २००७ मध्ये ही घटना घडली होती. घटनेच्या दहा वर्षांनंतर २०१७ मध्ये विद्युत व त्याच्या मित्राविरोधात खटला सुरू झाला होता.

१ सप्टेंबर २००७ च्या रात्री विद्युत त्याच्या मित्रांसोबत जुहू येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार्टी करत होता. हॉटेलमधून बाहेर पडताना राहुल सुरी या व्यावसायिकाचा विद्युतच्या मित्राला अनपेक्षितपणे धक्का लागला. यावरून जामवालचा मित्र हरिशनाथ गोस्वामी व राहुल सुरी यांच्यात बाचाबाची झाली. वाद इतका वाढला की गोस्वामीने सुरी यांच्या डोक्यावर काचेची बाटली फोडल्याचा आरोप केला गेला. पोलिसांच्या चौकशीदरम्यान सुरी यांनी विद्युतनेही त्यांच्यावर हल्ला केल्याचं सांगितलं. त्यानंतर जामवाल व गोस्वामी यांच्याविरोधात खटला सुरु झाला.

कोर्टाकडून वारंवार समन्स बजावल्यानंतर जामवाल सुनावणीदरम्यान हजर राहिला नव्हता. अखेर कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतर विद्युत सुनावणीसाठी हजर झाला होता. राहुल सुरी यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी विद्युत जामवाल व त्याचा मित्र हरिशनाथ गोस्वामी यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.