पॉप संगीताचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायकेल जॅक्सनच्या ‘ब्लड ऑन द डान्स फ्लोअर’ या म्युझिक अल्बमचा रिमिक्स अवतार लवकरच मायकलच्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे. १९९७ साली प्रदर्शित झालेला हा संगीत इतिहासातील आजवरच्या सर्वात लोकप्रिय अल्बमपैकी एक आहे. २५ दशलक्ष अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या या अल्बमचे दिग्दर्शन स्वत: मायकेल जॅक्सनने केले होते. त्यामुळे यातील प्रत्येक गाण्यावर त्याचा ठसा जाणवतो.

पाच नवीन आणि आठ जुन्या गाण्यांच्या रिमिक्सचा संच असलेल्या या अल्बममधील ‘इज इट स्केअरी’, ‘स्क्रीम लाऊडर’, ‘मनी’, ‘यू आर नॉट अलोन’ यांसारखी जवळ जवळ सर्वच गाणी ऑल टाइम हिट्स म्हणून ओळखली जातात. परंतु, यातील ‘ब्लड ऑन द डान्स फ्लोअर’ या शीर्षकगीताने मात्र इतर गाण्यांच्या तुलनेने विशेष लोकप्रियता मिळवली होती. त्याच्या गाजलेल्या गाण्यांना नव्या रूपात चाहत्यांना ऐकवण्यासाठी या म्युझिक अल्बमची पुनर्रचना केली जात आहे. जॅक्सनच्या ‘एम जे प्रॉडक्शन’ कंपनीतर्फे या अल्बमची निर्मिती केली जात असून त्यांच्या मते मायकेलच्या आवाजाला व त्याने निर्माण केलेल्या संगीताला जराही धक्का न पोहचवता एका नवीन फॉर्ममध्ये गाण्यांचे संकलन केले जाणार आहे.

तसेच १९९७ साली अल्बमच्या निर्मितीदरम्यान घडलेले गमतीदार प्रसंग, त्यातल्या कलाकारांचे अनुभव, आलेल्या समस्या आणि अल्बम प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी दिलेला प्रतिसाद यावर एक माहितीपट तयार केला जात असून त्याचाही यात समावेश केला जाणार आहे. याशिवाय, मायकेलच्या अचानक झालेल्या निधनामुळे त्याची प्रदर्शित होऊ न शकलेली काही खास गाणीही त्यात समाविष्ट असणार आहेत.