आगळ्या वेगळ्या नृत्यशैलीच्या जोरावर संपूर्ण जगाला वेड लावणारा किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सन मृत्यृनंतरही विविध कारणांमुळे सतत चर्चेत असतो. या वेळी मायकल HBO वाहिनीबरोबर झालेल्या एका वादामुळे चर्चेत आहे. या वाहिनीने मायकल जॅक्सनच्या कारकिर्दीवर आधारित लिव्हिंग नेव्हरलँड हा माहितीपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. या माहितीपटाविरोधात मायकलच्या संपत्तीची राखण करणाऱ्यांनी HBO वाहिनीवर तब्बल १०० दशलक्ष अमेरिकी डॉलरचा दावा ठोकला आहे.

१९९२ साली मायकलने द डेंजरस या म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन केले होते. या कार्यक्रमादरम्यान त्याच्यावर दोन अल्पवयीन मुंलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप करणयात आले होते. परंतु पुढे पुराव्यांअभावी त्याला निर्दोष सोडण्यात आले. हाच वाद तब्बल २७ वर्षानंतर पुन्हा एकदा उफाळुन बाहेर आला आहे.

मायकलच्या संपत्तीची राखण करणाऱ्यांच्या मते लिव्हिंग नेव्हरलँड या माहितीपटात मायकलवर लावण्यात आलेल्या आरोपांचाही उल्लेख केला गेला आहे. तसेच जॅक्सनच्या खाजगी आयुष्याशी संबंधित सर्व गोष्टींचे अधिकार त्याची मालमत्ता सांभाळणाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहेत. त्यामुळे एखादं पुस्तक किंवा चित्रपट तयार करण्याआधी त्यांची संमती घेणे अनिवार्य आहे. परंतु कोणतीही परवानगी न घेता HBO वाहिनीने हा माहितीपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांना विरोध केला जात आहे.