कला, ज्ञान, क्रीडा या क्षेत्रांत विशेष स्थान प्राप्त केलेल्या मंडळींना आपण सर्वसाधारणपणे सेलिब्रिटी असे संबोधतो. ही मंडळी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर प्रचंड लोकप्रियता आणि आर्थिक संपत्ती प्राप्त करतात. परंतु कारकीर्दीतील तो विशिष्ट काळ संपल्यानंतर तीच काळाची चक्र मग अधोगतीच्या दिशेने फिरू लागतात. पुढे त्यांचे समाजातील स्थान हळूहळू नगण्य होत जाते. परिणामी त्यांच्या निधनानंतर त्यांची जागा अन्य कोणी घेतो. आणि त्याचाही प्रवास तसाच सुरू होतो. परंतु काही सेलिब्रिटी असेही आहेत ज्यांचे अस्तित्व त्यांच्या मृत्यूनंतरही संपलेले नाही. उलटपक्षी आजही त्यांच्या लोकप्रियतेत त्याच गतीने वाढ होत आहे. ‘फोर्ब्स’ने अशाच पहिल्या १३ सेलिब्रिटींची नावे जाहीर केली आहेत. जे मृत्यूनंतरही लोकप्रियता आणि आर्थिक कमाईत अव्वल आहेत. या यादीत संपूर्ण जगाला आपल्या तालावर नाचवणारा ‘किंग ऑफ पॉप’ मायकल जॅक्सन अग्रस्थानी आहे. त्याचा मृत्यू म्हणजे न उलगडलेले कोडेच आहे. पण निधनानंतरही त्याच्या आर्थिक वृद्धीत मात्र खंड पडलेला नाही. उलट दररोज शेकडोंनी नवीन चाहते त्याच्या फेसबुक, ट्विटर, लिंकडीन या अकाउंटवर त्याला फॉलो करतात. त्याच्या गाण्यांची रॉयल्टी आणि बँग, सोनी, एम टीव्ही, व्हीएच १, बीटीएम यांसारख्या विविध संगीत कंपन्यांबरोबर केलेल्या करारांतून मायकलला कोटय़ावधींचा नफा मिळतो. तसेच त्याची अधिकृत वेबसाइट व स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीतून त्याला दरवर्षी ७५ दशलक्ष अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त आर्थिक नफा मिळतो. या यादीत अ‍ॅल्बर्ट आइन्स्टाइन देखील आहेत. त्यांच्या विविध संशोधन व वैज्ञानिक सिद्धांतांचे पेटंट आजही त्यांच्याच नावावर आहे. तसेच त्यांच्या अधिकृत वेबसाइट व इतर समाजमाध्यमांवरील खात्यांमधून त्यांना दरवर्षी १० दशलक्ष अमेरिकी डॉलरचा नफा मिळतो. याशिवाय यादीत अर्नोल्ड पामर (४० दशलक्ष अमेरिकी डॉलर), चार्ल्स शोल्स (३८ दशलक्ष अमेरिकी डॉलर), बॉब मार्ले (२३ दशलक्ष अमेरिकी डॉलर), टॉम पेटी (२० दशलक्ष अमेरिकी डॉलर), प्रिन्स (१८ दशलक्ष अमेरिकी डॉलर), जॉन लेनन (१२ दशलक्ष अमेरिकी डॉलर), डेव्हिड बॉवी (९.५ दशलक्ष अमेरिकी डॉलर), एलिझाबेथ टेलर (८ दशलक्ष अमेरिकी डॉलर) या सेलिब्रिटींचीही नावे आहेत ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जग जिंकले आणि त्यांची जादू त्यांच्या मृत्यूनंतरही कायम आहे. या आर्थिक संपत्तीचा वापर विविध सामाजिक संस्था, गरीब लोक व गरजू विद्यर्थाच्या शिक्षणासाठी केला जातो.