कलाविश्वातील अत्यंत प्रतिष्ठेचा ‘ऑस्कर’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात दक्षिण कोरियाने आपली छाप सोडली. तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी निर्मित केलेल्या डॉक्युमेंट्रीनंही पुरस्कार पटकावला. ‘अमेरिकन फॅक्ट्री’ला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. बराक ओबामा व मिशेल ओबामा यांच्या ‘हायर ग्राऊंड’ या निर्मिती संस्थेने डॉक्युमेंट्रीची निर्मिती केली आहे. सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री या विभागात अमेरिकन फॅक्ट्रीसोबतच द केव्ह, द एज ऑफ डेमोक्रेसी, फॉर सामा आणि हनिलँड यांना नामांकन मिळालं होतं.

स्टीव्हन बॉगनर आणि ज्युलिया रीचर हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्काराची घोषणा होताच बराक ओबामा यांनी ट्विट करत डॉक्युमेंट्रीच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

आणखी वाचा : ‘ऑस्कर’ विजेत्यांची निवड करतं कोण?

‘सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्रीसाठी ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या ज्युलिया आणि स्टीव्हन यांना खूप खूप शुभेच्छा. या डॉक्युमेंट्रीत आर्थिक बदलांचा माणसांवर कसा परिणाम होतो याबद्दलची कथा सांगण्यात आली आहे. हायर ग्राऊंड निर्मिती संस्थेच्या पहिल्याच डॉक्युमेंट्रीसाठी दोन प्रतिभावान कलाकारांना ऑस्कर मिळाला, हे पाहून खूप आनंद होतोय’, असं त्यांनी ट्विटरवर लिहिलं.