‘स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्याकडे, त्यांच्या समस्यांकडे माध्यमांचं दुर्लक्ष झालं आहे’, असं म्हणत भोजपुरी अभिनेता मनोज वाजपेयीयाने खंत व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया यांच्यावर कलाविश्वातील सध्या चर्चेत येत असलेली प्रकरणे, आंतरराष्ट्रीय घडामोडी यावर जास्त भर दिला जात आहे. मात्र, स्थलांतरित मजुरांचा मुद्दा बाजूला पडला आहे, असं मत मनोज वाजपेयीने एका मुलाखतीत व्यक्त केलं.

अलिकडेच मनोज वाजपेयीचं ‘बंबई में का बा’ हे भोजपुरी रॅपर सॉन्ग प्रदर्शित झालं. या रॅपरच्या माध्यमातून पहिल्यांदाच मनोज वाजपेयी एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाला. या गाण्याच्या माध्यमातून स्थलांतरित मजुरांची सध्याच्या काळात होणारी फरफट, त्यांच्या समस्या यावर भाष्य करण्यात आलं आहे. या गाण्याच्या निमित्ताने मनोज वाजपेयीने त्याचं मत व्यक्त मांडलं आहे.

“सध्याच्या घडीला स्थलांतरित मजूर, त्यांच्या समस्या यांकडे प्रसारमाध्यमांचं दुर्लक्ष होत आहे. याची फार खंत वाटते. खऱं तर रॅप सॉन्ग हे राग, संताप व्यक्त करण्याचं एक चांगलं माध्यम आहे”, असं मनोज वाजपेयी म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “करोनामुळे ओढावलेल्या संकटामुळे अनेक मजुरांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यामुळे अनेक जण त्यांच्या गावी पायी निघाल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी या मजुरांचा प्रवास, त्यांची समस्या आणि या संकटामुळे अनेकांचे गेलेल प्राण हे सारं काही माध्यमांमध्ये दाखवण्यात आलं. त्यामुळे बऱ्याच वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर याची चर्चादेखील झाली. मात्र, आता हा मुद्दा माध्यमांमधून अचानक गायब झाला आहे. हे खरंच फार चुकीचं आहे. या मजुरांच्या समस्येवर प्रसारमाध्यमांनी भाष्य केलं पाहिजे”.

दरम्यान, अनुभव सिन्हा निर्मिती आणि दिग्दर्शित ‘बंबई में का बा’ या म्युझिक अल्बममध्ये मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत झळकला असून त्याच्याच आवाजामध्ये हे गाणं स्वरबद्ध झालं आहे. विशेष म्हणजे या गाण्यात मनोज वाजपेयी पहिल्यांदाच एका रॅपरच्या रुपात झळकला आहे.