04 December 2020

News Flash

मिलिंद-अंकिताचं झूम फोटोशूट

त्यांच्या या छायाचित्रांवर त्याचे फॅन्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

संग्रहीत छायाचित्र

जय पाटील
अंधेरीतल्या वर्सोव्यातून शिवाजी पार्कातल्या मॉडेलचं फोटोशूट केल्याचं कोणी महिनाभरापूर्वी सांगितलं असतं, तर कोणीही त्याला वेड्यात काढलं असतं, पण तंत्रज्ञान काय कमाल घडवून आणेल सांगता येत नाही. वयाच्या ५४व्या वर्षीही तरुणींना वेड लावणाऱ्या मिलिंद सोमणचं असं फोटोशूट नुकतंच करण्यात आलं. मिलिंद आणि त्याची पत्नी अंकिता यांच्या शिवाजी पार्कातल्या घराच्या गच्चीवरून झूम कॉल करून छायाचित्रकार सुबी सॅम्युअलने टिपलेली ही छायाचित्र समाजमाध्यमांवर चांगलीच गाजली, हे सांगायलाच नको.

ब्रंच या नियतकालिकासाठी हे फोटोशूट करण्यात आलं आहे. अशा प्रकारचं तंत्रज्ञान वापरून छायाचित्रण करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा करण्यात आला आहे. छायाचित्रकारासाठी सर्वांत महत्त्वाचं काही असेल, तर प्रकाश. प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित नसताना प्रकाशाचा अंदाज बांधणं अशक्यच असतं. त्यातून मार्ग काढण्यासाठी आधी व्हिडीओ कॉल करून मिलिंदच्या घराच्या गच्चीत सूर्यास्तापूर्वीच्या प्रकाशात शूट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याच्या आईने उषा सोमण यांनी मोबाइल कॅमेरा पकडला होता. मिलिंद स्वतःच्या दिसण्याविषयी फारच जागरूक असतो. आपले फोटो नेमके कसे येत आहेत, फोटोग्राफर काय टिपतो आहे, हे न कळणं अस्वस्थता वाढवणारं असल्याचं मिलिंदने म्हटलं आहे. पूर्वी जेव्हा रोलचे कॅमेरे होते आणि फोटो डेव्हलप केल्याशिवाय तो कसा आला आहे हे जाणून घेण्याचा कोणताही मार्ग नसे, तसाच हा प्रकार होता. त्यात भर म्हणजे इंटरनेटमध्ये येणाऱ्या व्यत्ययाचाही सामना करावा लागत होता, मात्र जेव्हा फोटो पाहिले तेव्हा सुबीने आपलं काम उत्तम केल्याचं दिसलं, अशा भावना मिलिंद सोमणने व्यक्त केल्या आहेत.

त्याच्या या छायाचित्रांवर त्याचे फॅन्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. यातल्या एका छायाचित्रात मिलिंद आणि अंकिता ब्लँकेट गुंडाळून उभे आहेत. ते पाहून अनेकांनी मधु सप्रे आणि मिलिंद सोमण यांच्या एकेकाळी वादळ निर्माण केलेल्या फोटोची चर्चा पुन्हा सुरू केली आहे. मिलिंदने नुकताच हा फोटो समाजमाध्यमांवर पोस्ट केला होता. २५ वर्षांपूर्वी जेव्हा इंटरनेट, समाजमाध्यमं नव्हती, तेव्हा या फोटोने एवढा वादंग निर्माण केला होता. आजच्या स्थितीत काय प्रतिक्रिया उमटल्या असत्या, असा प्रश्न मला नेहमी पडतो, असं त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

मिलिंद सोमणने नुकताच टिकटॉकला रामराम केला. त्याबद्दल अनेकांनी त्याचं अभिनंदन केलं असून बॉयकॉट चायनीज प्रॉडक्ट्स असं आवाहन आपल्या कमेंट्समधून केलं आहे. घरात बंद राहण्याच्या या दिवसांत निर्माण झालेल्या अनेक अडथळ्यांवर तंत्रज्ञानाने पर्याय उपलब्ध करून दिले. हा त्यातलाच आणखी एक पर्याय…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 9:49 pm

Web Title: milind ankitas zoom photoshoot msr 87 2
Next Stories
1 २ लाखांपेक्षा जास्त करोनाग्रस्त, हजारोंचा मृत्यू, सरकार चूक मान्य करणार का? अभिनेत्याचा सवाल
2 नागार्जुनच्या सुनेवर निशाणा साधल्यामुळे पूजा हेगडेवर चाहते नाराज
3 रिंकू राजगुरुला रॅपर रफ्तारकडून खास गिफ्ट
Just Now!
X