मॉडेल, अभिनेता व फिटनेस फ्रीक मिलिंद सोमण सोशल नेटवर्किंगवर प्रचंड अ‍ॅक्टीव्ह आहे. मिलिंदला टिक टॉकवरही मोठ्याप्रमाणात फॉलोअर्स आहेत. मात्र मिलिंदने टिक टॉक अकाउंट बंद केल्याची घोषणा ट्विटवरुन केली आहे. प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्यासंदर्भात केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मिलिंदने हे पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे. २०१८ साली रेमन मॅगसेसे पुरस्कार जिंकणाऱ्या वांगचुक यांनी युट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यामधून त्यांनी भारतीय खूप मोठ्या प्रमाणात चीनला प्रत्यक्षपणे आर्थिक मदत करत असतात असं म्हटलं आहे. एकीकडे भारतीय सैन्य चीनला गोळ्यांनी म्हणजेच बुलेट्सने उत्तर देत असतानाच मुंबई, दिल्ली, बेंगळूरूबरोबरच देशातील सर्व भागांमधील नागरिकांनी चीनला पाकिटातून म्हणजेच वॉलेटच्या माध्यमातून धडा शिकवला पाहिजे असं मत वांगचुक यांनी व्यक्त केलं आहे.

नक्की वाचा >> “तुम्ही ‘मेड इन चायना’वर खर्च करणारा प्रत्येक पैसा भारतीय सैन्याविरोधात वापरला जाईल”

वांगचुक यांनी आठवड्याभरामध्ये चिनी सॉफ्टवेअर वापरण्याचं बंद करा आणि वर्षभरामध्ये चिनी हार्डवेअर म्हणजेच इलेक्ट्रीक उपकरणे वापरणं बंद करा असं आवाहन केलं आहे. टिक टॉक या लोकप्रिय व्हिडिओ शेअरिंग अ‍ॅप्सचे सर्वाधिक वापरकर्ते म्हणजेच युझर्स भारतामध्ये आहे. २०१९ साली जून महिन्यात करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणामध्ये १२ कोटी भारतीय हे अ‍ॅप वापरत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या भारत आणि चीनदरम्यान सुरु असणाऱ्या वादामुळे चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन सोशल मिडियाच्या माध्यमातून केलं जात आहे. याच आवाहनाला प्रतिसाद देताना मलिंदने एक ट्विट केलं आहे. “मी आता टिक टॉकवर नाही,” असं मिलिंदने ट्विटमध्ये म्हटलं असून त्याने या ट्विटबरोबर वांगचुक यांच्या व्हिडिओची लिंक पोस्ट केली आहे.

करोनाचा संसर्ग चीनमधील वुहानमधून जगभरामध्ये झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अनेक देशांमध्ये चीनविरोधात नाराजी आहे. याचा नाराजीचा फायदा घेत आपण चीनला आर्थिक दृष्ट्या दुबळं करु शकतो असं मज वांगचुक यांनी व्यक्त केलं होतं. त्याच भारतामध्ये टिक टॉकविरोधात वातावरण निर्मितीसाठी काही वादग्रस्त व्हिडिओ, टिक टॉकविरुद्ध युट्यूब या गोष्टींनाही फोडणी दिली. टिक टॉकचं गुगल प्लेवरील रेटिंग मागील काही आठवड्यात झपाट्याने उतरलं होतं.

काय म्हणाले होते वांगचुक?

करोनामुळे चीनचे आर्थिक कंबरडे मोडले असून आता चीन पुन्हा उभा राहण्यासाठी धडपडत आहे. चीनचा जीडीपी मोठ्या प्रमाणात पडला आहे. तेथे मोठ्याप्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील जनतेमध्ये असंतोष आहे. मात्र या असंतोषाचा उद्रेक होऊ नये म्हणून चीन आजूबाजूच्या देशांशी काही ना काही खुसपटं काढत असल्याचे निरिक्षण वांगचुक यांनी नोंदवलं आहे. “चीनमधील नागरिकांमधील देशभक्तीची भावना एकत्र आणण्यासाठी आणि तेथील आर्थिक परिस्थितीमुळे उद्रेक होऊन राज्यकर्त्यांविरोधात रोष निर्माण होऊ नये म्हणून चीन आजूबाजूच्या देशांबरोबर काही ना काही विषयावरुन संघर्षाची परिस्थिती निर्माण करु पाहत आहे. आज चीनमध्ये मोठ्याप्रमाणात असंतोष आहे. मात्र तेथील राजकीय परिस्थितीमुळे देशातील १४० कोटी जनता सरकारच्या दबावाखाली काम करत आहे. जनतेमधील असंतोष उफाळून येऊ नये म्हणून त्यांचे लक्ष विचलीत करण्यासाठी चीन आजूबाजूच्या देशांशी संबंधित अनेक विषयांना हात घालत आहे,” असं वांगचुक म्हणाले आहेत.

“आपल्या देशातील १३० कोटी जनता आणि परदेशातील तीन कोटी भारतीयांनी एकत्र येऊन देशात आणि जगभरामध्ये चिनी वस्तुंवर बहिष्कार घालण्याची मोहीम सुरु केल्यास त्याला जगभरातून प्रतिसाद मिळू शकतो. आज जगभरामध्ये चीनविरोधी वातावरण आहे. जगभरामधून चिनी सामानावर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली तर चीनची भिती सत्यात उतरेल आणि तेथील अर्थव्यवस्था कोसळेल. सामान्य लोकं रस्त्यावर येऊन विरोध नोंदवतील आणि त्या माध्यमातून चीनमध्ये सत्तांतर होईल. असं झालं नाही तर दुर्देवाची गोष्ट असेल कारण एकीकडे आपले सैनिक चीनविरोधात सीमेवर लढत असतील तर दुसरीकडे भारतीय नागरिक मोबाइलपासून ते लॅपटॉपर्यंत आणि कपड्यांपासून खेळण्यांपर्यंत गोष्टींचा वापर करुन चीनच्या सैन्याला पैसा पुरवत असतील,” असं वांगचुक म्हणाले.

“हार्डवेअरबरोबरच भारतातील तरुण मुलं टीकटॉक, शेअरइट सारख्या चिनी अॅपच्या वापराच्या माध्यमातून चीनला अनेक कोटींची मदत करत असतील. त्यामुळेच आपण एकत्र येऊन चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरु करावी. ही मोहीम भारतासाठीही एक वरदान ठरेल. आपण हे सामान वापरणं बंद केलं तर देशातील सामान वापरुन आणि त्यामधून पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे आत्मनिर्भर बनू,” असा विश्वास वांगचुक यांनी व्यक्त केला आहे.