– राधिका पार्थ

तीन दिवसांपासून सल्लूभाई म्हणजेच तरुणांचा आवडता अभिनेता सलमान खान याच्या ‘भाई भाई’ या गाण्याने युट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. सल्लूचं हे गाणं युट्यूब  ट्रेंडिंगच्या तिसऱ्या स्थानावर आहे. अवघ्या तीन दिवसांत २ कोटी ३० लाख लोकांनी सल्लूचं हे गाणं पाहिलं आहे. रमजान ईदचं निमित्त साधून सलमान खानने हे गाणं युट्यूबवर अपलोड केलं आहे आणि नेहमीप्रमाणे साजिद-वाजिद यांचं संगीत या गाण्याला लाभलं आहे. या गाण्याचं वैशिष्ट म्हणजे सल्लूने हे स्वतः लिहिलं आहे आणि इतकंच नव्हे तर हे गाण सल्लूने स्वतः गायलं देखील आहे.

‘हिंदू-मुस्लिम भाई भाई’, हे जुनेच शब्द घेऊन सल्लूने नव्या गाण्याची रचना केलेली आहे. ती अशी…

यारों के हम तो यार हैं
सारे अपने ही त्योहार हैं…
कभी सुने हम अजान
कभी भजन गुनाए…
हिंदू-मुस्लिम भाई भाई
क्या बोलते मिया भाई…

नेहमीप्रमाणे सलमान खान रमजान ईदच्या दिवशी आपला नवा चित्रपट रिलीज करतो. ही परंपरा त्याने दहा-अकरा वर्षांपासून जपली आहे. मात्र, यंदा करोना कहरात सल्लूला ते शक्य झालेलं नाही. तरीही त्याने आपल्या चाहत्यांना नाराज केलेेलं नाही. कारण, रमजान ईदच्या दिवशीच ‘भाई भाई’ हे गाणं सल्लूने लिहून आणि गाऊन चाहत्यांना खुश केलेलं आहे. या गाण्यातून त्याने हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, आपण सगळे बंधू आहोत असा संदेश दिला आहे. तसेच, सगळ्यांनी मिळून देशावर आलेल्या वेगवेगळ्या संकटावर मात केली पाहिजे, असा त्याच्या गाण्याचा अर्थ आहे.

खरं तर सल्लू आणि त्याचे काही सहकारी पनवेलच्या त्याच्या फार्म हाऊसवर अडकलेले आहेत. याच काळात म्हणजे महिनाभरापूर्वी सल्लूने स्वतःचे ‘सलमान खान’ नावाचे युट्यूब चॅनेलदेखील तयार केले. अगोदरच प्रचंड चाहता वर्ग लाभलेल्या सल्लूला युट्यूबवरही चांगलंच प्रेम मिळालं आहे. त्याच्या युट्यूब चॅनेलला आत्तापर्यंत २२ लाख लोकांनी पसंती दर्शविली आहे. ‘हिंदू-मुस्लिम भाई भाई’ चर्चेत असलेलं हे गाणं सल्लूने त्याच्या फार्म हाऊसवरच साध्या पद्धतीने शूट केलेलं आहे आणि स्वतःच गायलेलंही आहे. त्यामध्ये रॅपचा तडकादेखील देण्याचा प्रयत्न केला आहे. या पूर्वीही ‘तेरे बिन’ हे गाणंदेखील जॅकलीनसोबत फार्म हाऊसवरच शूट करून युट्यूबवर अपलोड केलं, त्यालाही चाहत्यांनी भरपूर पसंती दर्शविली आहे.

असं असलं तरी सलमान खान गाणार म्हंटल्यावर अनेकांच्या कपाळावर आट्या पडतात. वयाच्या ५४ व्या वर्षी  सल्लू जर एखाद्या गुंडासारखा वागताना दिसला तर अनेकांना ते आवडतही नाही. ‘हिंदू-मुस्लिम भाई भाई’, या विधायक संदेश देणाऱ्या गाण्यात सल्लू कॅमेऱ्यासमोर एखाद्या गुंडासारखाच अभिनय करतो, गाणं म्हणतो, अशा पद्धतीची टिप्पणी  देखील या गाण्यावर काही जणांकडून करण्यात आली आहे. तरीसुद्धा सल्लू आपले गायनाचे प्रयोग सुरूच ठेवतो. सल्लूची लोकप्रियता आणि चाहत्यांचं प्रेम ‘भाई भाई’ या गाण्याला युट्यूबवर वरचं स्थान देत आहे.