सुपर हिरो नायकाला अमेरिकी सिनेमा नेहमी भलामण करूनच सादर करतो. ब्रिटिश सिनेमांमध्ये मात्र सुपर हिरो हे सुपर हेर असतात किंवा सुपर झीरो. शेरलॉक होम्सला दर दशकामध्ये वेगवेगळ्या दिग्दर्शक-नायकांनी सादर करूनही दरवेळचा ताजा शेरलॉक लोकप्रियतेची शिखरं गाठताना दिसतो. आपल्याकडे ऑस्कर सिनेमांच्या नामांकन गर्दीत जर ब्रिटिश सिनेमा असला तरच त्याचे सर्वानुआकलन होते, अन्यथा थिएटरमध्ये आवर्जून चांगले ब्रिटिश चित्रपट लागत नाहीत. डॅनी बॉएल या ब्रिटिश दिग्दर्शकाच्या भारतातील ‘स्लमडॉग मिलिऑनेर’ या चित्रपटाच्या आसपासच्या काळात पायरसीमुळे येथील सिनेमावेडय़ांच्या वर्तुळात ब्रिटिश चित्रपट आणि टीव्ही मालिका दाखल होत होत्या. आता शोध घेतला तर अमेरिकेइतक्याच मोठय़ा प्रमाणावर ब्रिटिश सिनेमा उपलब्ध होतो. ठेवणीतला बोचरा विनोद, हेरगिरी, तपास, चोर-दरोडेखोर आणि पोलीस यंत्रणा यांच्या आवर्तनांमध्ये तयार होणारा चांगला ब्रिटिश चित्रपट पाहायचा असेल तर डॅनी बॉएलचे ‘श्ॉलो ग्रेव्ह’, ‘मिलियन्स’, ‘ट्रेन्स्पॉटिंग’चे दोन्ही भाग आवर्जून अनुभवावेत आणि एडगर राइटच्या ‘स्पेस्ड’ टीव्ही मालिकेपासून ते ‘कॉरनॅटो’ चित्रत्रयीमधील ‘शॉन ऑफ द डेड’, ‘हॉट फज’ आणि ‘द वर्ल्डस एंड’ या तिकडम चित्रपटांचाही आस्वाद घ्यावा. अमेरिकी चित्रपटांतून प्रेरणा घेऊन त्याच तोडीचा चित्रपट बनविण्याचा हा ब्रिटिश कॉमेडीचा प्रकार मोठा गमतीशीर आहे. ब्रिटिश सर्वार्थाने विनोदबुद्धीला कसे जगतात आणि कसे जगू देतात, याचे उदाहरण दाखविणारा आणि गेल्या वर्षभरात कल्टहीट ठरलेला ‘माइंडहॉर्न’ नावाचा विचित्रपट आजच्या लेखाचा विषय आहे. हा चित्रपट वरच्या मुख्य धारेतला चित्रपट नसला तरी तो त्या पंगतीत जाऊन बसला त्याला कारणीभूत अर्थातच त्यातील विनोदतत्त्व आहे.

‘माइंडहॉर्न’ म्हटले तर बावळटपणाचा शोधून काढलेला अस्सल नमुना आहे. त्याचा उद्गम आहे ऐंशी-नव्वदच्या दशकातील टीव्ही मालिका. अर्थात आपल्याला इथे ब्रिटिश टीव्ही मालिका माहिती असल्या-नसल्या तरी हरकत नाही. आपल्याकडे ऐंशीच्या दशकामध्ये ज्या पद्धतीने दूरदर्शनच्या एका वाहिनीवर मालिका चालत, त्याहून त्या फार वेगळ्या नसत. तरीही त्याहून काहीशा उजव्या, पण मूर्ख व्यक्तिरेखांच्या ताफ्यांनी त्या भरलेल्या असत. या चित्रपटामध्ये त्या टीव्ही युगात रिचर्ड थॉर्नक्रॉफ्ट (जुलियन बॅरेट) या अभिनेत्याने साकारलेली ब्रूस माइंडहॉर्न या सुपर हिरो हेराची टीव्ही मालिका प्रचंड लोकप्रिय झालेली असते. त्याचा तयार करण्यात आलेला एक यांत्रिक डोळा जगात फक्त सत्यच पाहू शकतो आणि सत्याला उघड करण्यासाठी कार्यरत राहतो. तर या मानवी जादूच्या डोळ्यांचा सुपर हिरो साकारणारा कलाकार पंचवीस वर्षांनंतर दुसऱ्या शहरात कफल्लक जगणे जगत असतो. तरीही माइंडहॉर्नच्या भूमिकेतील प्रसिद्धी म्हातारपणातही डोक्यात घेऊन जगात वावरत असतो. त्याच्या अस्तित्वाचीही कुणी दखल घेत नसला तरी माइंडहॉर्न या सुपर हेराच्या अतिशय विचित्र शिसारी आणणाऱ्या हालचाली रिचर्ड अजूनही इतरांना करून दाखवत असतो. त्याला छोटय़ाशा नव्या भूमिकाही मिळत नाहीत. या अवस्थेतच एकाएकी त्याचे आयुष्य एका चाहत्यामुळे फळफळते. पण हा चाहता साधासुधा व्यक्ती नसतो, तर पोलिसांना संशय असलेला, खुनांची मालिका रचणारा गुन्हेगार असतो. आपल्याकडून झालेल्या खुनांची किंवा कोणत्याही गोष्टीची कबुली आपण माइंडहॉर्न या  टीव्हीवर पाहिलेल्या सुपर हेरालाच सांगणार, असे तो गुप्त आरोपी जाहीर करतो. पोलीस पडद्याआड गेलेल्या माइंडहॉर्न रिचर्ड याला पाचारण करतात आणि तपास विक्षिप्त अंगांनी सुरू करून रिचर्डसमोर आवाहनांचे मोठे डोंगर ठेवतात.

या खूनसत्राच्या तपासामुळे आपण प्रसिद्धीच्या झोतात येऊ ही संधी पाहून रिचर्ड आपले पंचवीस वर्षांचे छोटय़ा पडद्यावरील हरविलेले अस्तित्व पुन्हा उभारण्यास सज्ज होतो आणि रहस्यरंजनाची एक्स्प्रेस वेगाने धावू लागते.

चित्रपटभर निव्वळ गंमत, विनोद आणि जुलियन बॅरेट या अभिनेत्याचा प्रचंड आत्मविश्वासाने वाईट अभिनेता असल्याचा अभिनय पाहायला मिळतो आणि ब्रिटिशांच्या उस्फूर्त विनोदाची बरसात पाहायला मिळते. रहस्य कमालीचे ताणून हा चित्रपट आपल्या देशातील तीस वर्षांपूर्वीच्या टीव्ही मालिकांमधला मूर्खपणाचा समाचार घेतो. यात शेवटच्या निर्णायक प्रसंगी बंदुकीच्या गोळ्यांपासून बचावासाठी केले जाणारे नृत्य आपल्याकडच्या मिथुन चक्रवर्ती आदी प्रभृतींनाही मागे टाकणारे आहे. एकूणच काय तर स्मरणरंजनाऐवजी स्मरणभंजनाचा मूलमंत्र देणारा हा चित्रपट आपल्या सिटकॉम्स आणि आपल्या सिनेमांतील बावळटपणाला इंधन म्हणून वापरतो. आपल्या विनोदी चित्रपटांना पाहताना डोके बाजूला ठेवावे लागते, ते न करता पाहायचा असा हा तिकडम ब्रिटकॉम आहे.