‘अलिशा’, ‘सावली’, ‘सावरिया.कॉम’, ‘ओ मारिया’, ‘अ रेनी डे’ या चित्रपटानंतर दिग्दर्शक राजेंद्र तालक यांचा ‘मिरांडा हाऊ स’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. काव्यमय शैलीतून उलगडणाऱ्या त्यांच्या चित्रपटांनी चित्रपट माध्यम म्हणून त्याकडे लक्ष वेधलेच. चित्रपटातून सामाजिक बांधिलकीचा आशय मांडणे हेही त्यांच्या दिग्दर्शकीय शैलीचे वैशिष्टय़ आहे. ‘मिरांडा हाऊस’च्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद..

‘मिरांडा हाऊ स’ या आगामी चित्रपटाविषयी विचारले असता राजेंद्र तालक म्हणाले, रहस्यमय चित्रपट असल्यामुळे कथेविषयी काही सांगत नाही, पण चित्रपटाची मांडणी नक्कीच वेगळी आहे. साईंकित कामत, मिलिंद गुणाजी आणि पल्लवी सुभाष या कलाकारांनी खूप छान काम केलं आहे. या तिघांच्या व्यक्तिरेखेभोवती चित्रपटाची कथा गुंफण्यात आली असून या तिघाव्यक्तिरेखांच्या मनात काय सुरू आहे? ते म्हणजे हा चित्रपट आहे. त्यातील चौथं पात्र हे प्रेक्षकांचं आहे. प्रेक्षक या तिघांच्या गोष्टीत पहिल्या दृश्यापासून गुंतले जातात, शेवट काय असेल याचा अंदाज त्यांनाही बांधता येत नाही. शेवटच्या दृश्यापर्यंत खिळवून ठेवणारा हा चित्रपट आहे. कारण प्रभावी दृश्यरूप मांडणीतच रहस्य असतं. ‘बदला’, ‘अंधाधून’ यांसारखे चित्रपट प्रेक्षकांना आवडले. त्यामुळे मराठीतील हा रहस्यमय विषय प्रेक्षक नक्कीच आवडीने बघतील.

तालक यांच्या चित्रपटातून गोव्याचा निसर्ग एखाद्या व्यक्तिरेखेसारखा उठून दिसतो. यावर त्यांनी सांगितलं, या चित्रपटाचेही बहुतांशी चित्रीकरण गोव्यात झाले आहे. तिथला निसर्ग, तिथली जुन्या वळणाची घरं आणि ‘मिरांडा हाऊ स’ नावाचं ठिकाणही तिथलंच आहे. ‘अ रेनी डे’ चित्रपटाचीही मांडणी वेगळ्या प्रकारे केली होती. या चित्रपटात ध्वनीचा वापर संगीतासारखा करण्यात आला होता. हळूहळू गोष्ट उलगडत नेणं मला आवडतं. उगाच गुंतागुंत करून ठेवणं आवडत नाही. साध्या सोप्या भाषेत आपण चांगला चित्रपट करू शकतो. चित्रपटात मी संवाद फार कमी ठेवतो. साधं संभाषण वाटेल, एवढय़ापुरतेच संवाद असतात. त्यामुळे प्रेक्षक चित्रपटाच्या कथेत शिरतो. ‘फिल्मी डायलॉग’ रसभंग करतात. ते टाळावेत.

दिग्दर्शनाकडे वळण्याआधी मी नाटय़क्षेत्रात कार्यरत होतो. दिग्दर्शनाबरोबर नाटकाचं संगीत, लेखन, सेट अशी विविध अंगं मला माहिती होती. त्याचा फायदा चित्रपट माध्यमासाठी झाला. व्यावसायिक चित्रपटांपेक्षा प्रादेशिक चित्रपट करायला जास्त आवडतात. याविषयीची एक आठवण सांगताना ते म्हणाले,  ‘मी गो. नी. दांडेकराच्या ‘शितू’ कादंबरीवर नाटक करत होतो. त्यासाठी संगीत देत असताना यावर एक टेलिफिल्म होऊ  शकते, असा विचार आला. मग ती टेलिफिल्म केली. ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनीही कौतुक कले. त्यानंतर मला स्वत:ला  आत्मविश्वास मिळाला आणि मी चित्रपट माध्यमाकडे वळलो. त्यासाठी लागणारे विषय हेसुद्धा माझ्या आवतीभोवती घडणारेच होते.

चित्रपट महोत्सवांमुळे जगभरातील चित्रपट कसा आहे? आणि आपण कुठे आहोत? हे कळतं. एकाच ठिकाणी विविध शैलीचे चित्रपट पाहाता येतात, शिकायलाही मिळतं आणि त्यातूनच नवीन काही करण्याची स्फूर्ती मिळते.

प्रेक्षकांना काय आवडतं, हे बघून आपण चित्रपट करतो. दोन तास मनोरंजनासाठी गाणी वगैरेची योजना करून चित्रपट करा, अशी एक मानसिकता आहे. कलात्मक चित्रपटांविषयी, अरे हे असे चित्रपट पाहून उगाच ताण कशाला घ्या, असा दृष्टिकोन स्वत: माध्यमकर्तेच ठेवतात. प्रेक्षकांना ताण देणारे, एकूण विचार करायला लावणारे चित्रपट नको हे माध्यमकर्तेच ठरवतात, पण दुसऱ्यांचा ताण बघून (चित्रपटातील) आपला ताण कमी होतो. चांगला चित्रपट हा इथे प्रेक्षक टाळ्या वाजवतील असं आखून केलेला नसतो. विशिष्ट ठोकताळे आखून केलेला चित्रपट हा वाईट चित्रपट असतो. त्यामुळे नियोजन केलेल्या वाईट चित्रपटापेक्षा उत्तम गोष्टीवर आधारलेला चांगला चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. पटकथेची दृश्यात्मक मांडणी प्रेक्षकाला आकर्षित करतेच. त्यासाठी ठोकताळ्यांची आवश्यकता नाही, असंही एका प्रश्नाच्या उत्तरात तालक म्हणाले.

चित्रपटात पण चांगला चित्रपट आणि वाईट चित्रपट असे दोन ठळक भेद आहेत. त्यामुळे चांगल्या चित्रपटाकडे आपण वळलं पाहिजे आणि प्रेक्षकांनाही चांगल्या चित्रपटाकडे वळवलं पाहिजे. चित्रपट या माध्यमाची ताकद खूप मोठी आहे. त्यामुळे त्याकडे फक्त मनोरंजन म्हणून न पाहता, समाजप्रबोधन म्हणूनही पाहणं आवश्यक आहे, तसंच ते चित्रपट प्रादेशिकतेतल्या चांगल्या गोष्टींना धरून तयार झाले पाहिजेत. प्रादेशिक चित्रपटांमुळेच जागतिक पातळीवर भारताचं नाव उंचावत आहे.    – राजेंद्र तालक