बंगाली आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारी अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचे शुक्रवारी निधन झाले. त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी पोस्ट करत तिला श्रद्धांजली वाहिली. पण नावात गोंधळ झाल्यामुळे चुकून काही लोकांनी अभिनेत्री मिष्टी मुखर्जी ऐवजी बंगालमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल मिष्टी चक्रवर्तीचे निधन झाल्याचे पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली. जेव्हा यासंदर्भातील माहिती मिष्टी चक्रवर्तीला मिळाली तेव्हा तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.
विको टरमरिकच्या जाहिरातीमध्ये दिसणाऱ्या मिष्टी चक्रवर्तीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्क्रीनशॉट शेअर केला. ‘काही लोकांच्या मते माझे आज निधन झाले आहे. देवाच्या कृपेने मी जीवंत आणि निरोगी आहे’ असे तिने कॅप्शन दिले आहे.
कोण आहे मिष्टी चक्रवर्ती?
मिष्टी चक्रवर्तीने करिअरची सुरुवात एका जाहिरातीने केली होती. त्यानंतर २०१४मध्ये तिने ‘पोरिचोई’ या चित्रपटातून डेब्यू केला. त्यानंतर मिष्टीने सुभाष घई यांच्या ‘कांची: द अनब्रेकेबल’ या चित्रपटात काम करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तसेच तिने ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘बेगम जान’ आणि ‘मणिकर्णिका’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिंदी, बंगालीसह मिष्टीने तामिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मिष्टी मुखर्जीचे निधन
अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचे किडनीच्या आजाराने निधन झाले. ती २७ वर्षांची होती. शुक्रवारी रात्री तिचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ती रुग्णालयात उपचार घेत होती. मात्र तिची प्राणज्योत शुक्रवारी रात्री उशिरा मालवली. शनिवारी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 5, 2020 1:40 pm