‘मिस युनिव्हर्स’चा यंदाचा किताब प्रदान करताना सूत्रसंचालकाने घातलेल्या नावाच्या घोळावर ‘मिस कोलंबिया’ने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मिस कोलंबिया म्हणजेच अरिअदना गुटिरर्ज अरेविलो हिने आपल्या इंस्टग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करुन झालेल्या प्रकरणावर आपले मत मांडले आहे. मी नशीबावर विश्वास ठेवते आणि जेव्हा मिस युनिव्हर्स म्हणून माझ्या नावाची घोषणा झाली होती. तो क्षण मला कधीच विसरता येणार नाही, असे ‘मिस कोलंबिया’ म्हणाली.
..अशी झाली ‘मिस युनिव्हर्स’मध्ये ‘मिस’टेक
वादळानंतर शांतता येते. माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या सर्वांचेच मी आभार मानते. मी नशीबवान आहे की, मला फक्त माझ्या देशातूनच नव्हे तर, जगभरातून पाठिंबा मिळतो आहे, असेही तिने नमूद केले आहे. यासोबतच ‘मिस कोलंबिया’ने ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेची विजेती ठरलेल्या ‘मिस  फिलिपिन्स’लाही शुभेच्छा दिल्या आहेत.
तुमचे नशीब आधीच लिहलेले असते आणि माझ्या नशीबात हेच लिहले असावे. मिस युनिव्हर्स म्हणून घोषणा झाल्यानंतर काही मिनिटे मी माझ्या देशासाठी आनंदाचे क्षण घेऊन आली होती. यामुळेच आज कोलंबिया आणि लॅटिन अमेरिकेतील समुदायाबाबत जगभरात चर्चा सुरु आहे, असेही ती पुढे म्हणाले.
जाणून घ्या ‘ती’ चुकीची घोषणा करणारा सूत्रसंचालक कोण?
काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील लास वेगासमध्ये पार पडलेल्या ६४ व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत विजेतीचे नाव घोषित करताना सूत्रसंचालक स्टीव्ह हार्वे  याने घोळ घातला होता. स्पर्धेची उपविजेती ठरलेली ‘मिस कोलंबिया’चे नाव त्याने चुकून विजेती म्हणून घोषित केले होते. एवढेच नाही तर तिला विजेतेपदाचा मुकूट देखील प्रदान करण्यात आला होता. मात्र, चूक लक्षात आल्यानंतर ‘मिस कोलंबिया’च्या डोक्यावर झळकलेला मुकूट तिच्याकडून परत घेऊन स्पर्धेची खरी विजेती असलेल्या ‘मिस फिलिपिन्स’ला प्रदान करण्यात आला. झालेल्या चूकीची संपूर्ण जबाबदारी स्विकारून सूत्रसंचालक स्टीव्ह हार्वेने कार्यक्रमात जाहीर माफी देखील मागितली होती.