काही दिवसांपीर्वीच ‘मिस वर्ल्ड २०१७ इज….’ असं म्हटल्यावर अनेक भारतीयांच्या हृदयाचा ठोका चुकला होता. कारण, तो क्षण होता विश्वसुंदरीच्या नावाची घोषणा होण्याचा. भारताची मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड सौंदर्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. त्यावेळी खुद्द मानुषीच्या मनातही बरेच विचार घर करुन होते, आणि सरतेशेवटी ते नाव जाहीर झाले. तब्बल १७ वर्षांनी भारतीय सौंदर्यवती मानुषी छिल्लरला मिस वर्ल्ड हा किताब मिळाला.

मानुषीला हा किताब मिळाल्यापासून, अनेकांनीच तिच्याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेण्यास सुरुवात केली. बऱ्याच नेटकऱ्यांमध्ये मानुषीच्या डाएट प्लॅनविषयी जाणून घेण्यासाठीचीसुद्धा उत्सुकता पाहायल मिळाली. कारण, इतक्या मोठ्या सौंदर्यस्पर्धेमध्ये सहभागी व्हायचे म्हटल्यावर त्यासाठी शारीरिक सुदृढता आणि समतोल आहार या साऱ्याची काळजी घेणे फारच महत्त्वाचे. मानुषीला यामध्ये मदत झाली ती सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ नमामी अग्रवालची. मानुषीच्या डाएटची काळजी तिने घेतली होती. मिस वर्ल्ड या स्पर्धेत जाण्यापूर्वीच नमामीने तिला जास्तीत जास्त प्रथिने असलेल्या डाएटचा प्लॅन आखून दिला होता.

‘एनहीडीव्ही फुड्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मानुषीच्या खाण्याच्या वेळा अजिबात न चुकवता पुरेसा आहार घेण्यावर नमामीने भर दिला होता. त्यासाठी मानुषी न्याहारीच्या वेळी ताजी फळे, कडधान्ये आणि योगर्ट या पदार्थांचे सेवन करायची. त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये एक वाटी भात किंवा एक/ दोन चपात्या, भाजी, सॅलड आणि रायता हे पदार्थ, संध्याकाळच्या वेळी काकडी आणि गाजराच्या स्टीक्ससह ती फळांची स्मुथी आणि रात्रीच्या जेवणामध्ये व्कीनोआ पुलाव, टोफू सॅलड आणि सूप हे पदार्थ खाण्याला प्राधान्य द्यायची. डाएटच्या नावाखाली उगाचच उपासमार न होऊ देणे हा तिच्या आहारतज्ज्ञाचा मुख्य उद्देश होता. शरीरातील पाण्याच्या प्रमाणात समतोल राखण्यासाठी दिवसातून तीन लिटर पाणी पिणे ही तिच्या डाएटमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट.

आहारासोबतच ती व्यायामावरही तितकाच भर द्यायची.. पण, त्यात कुठेही अतिरेक नव्हता. योगसाधना आणि चालणे, पळणे याचा तिच्या नेहमीच्या व्यायामध्ये समावेश होता. मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी आखून दिलेल्या डाएट प्लॅनमधील काही महत्त्वाच्या गोष्टी तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरही शेअर केल्या होत्या. ‘नमामी अग्रवालने माझ्यासाठी दर दिवसाच्या अनुशंगाने दिलेल्या डाएट टीप्स…’, असे म्हणत तिने काही टीप्स पोस्ट केल्या होत्या. ज्यामध्ये ‘न्याहारी अजिबात टाळू नका, रोजचा संतुलित आहार खा, साखरेचे प्रमाण कमी करा’, अशा काही उपयुक्त टीप्स तिने शेअर केल्या होत्या.

https://www.instagram.com/p/BbZ7eM9jtyn/

मानुषीचा हा डाएट प्लॅन सध्या अनेकांचे लक्ष वेधत आहे. कारण, सर्वसामान्यांच्या दृष्टीनेसुद्धा त्यातीच बऱ्याच गोष्टी फायद्याच्या असून, मॉडेलिंग विश्वात करिअर करु इच्छिणाऱ्या तरुणींसाठी तर या प्लॅनमुळे फार गोष्टी सोप्या झाल्या आहेत असे म्हणायला हरकत नाही.

https://www.instagram.com/p/BbdcjNbDNVL/