मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरनं तिला आलेला एक सुंदर अनुभव इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मानुषी सध्या ‘ब्युटी विथ अ परपज’ साठी जगभरातील विविध लोकांना भेटत आहे. नुकताच मानुषीनं महेश नावाच्या फुलं विक्रेत्यासोबत फोटो शेअर केला आहे. महेशची घरची परिस्थिती हालाखीची आहे. फी भरण्यासाठी तो रस्त्यावर गुलाबाची फुलं विकतो.

मेहनती महेशकडे एकदा सहज मानुषीचं लक्ष गेलं. तिनं महेशची चौकशी केली असता ट्यूशनची फी भरण्यासाठी आपण फुलं विकतो असं त्यानं तिला सांगितलं. महेशला गणित आणि इंग्रजी हे विषय आवडतात आणि ट्यूशन फी भरण्यासाठी तो आईला थोडा हातभार लावतो असं त्यानं मानुषीला सांगितलं. या मुलाची शिकण्यासाठी धडपड पाहून मानुषीनं महेशकडे मदतीचा हात पुढे केला.

तिनं फी भरण्याची पूर्ण तयारी दर्शवली. पण महेशनं मात्र प्रामाणिकपणे ती नाकारली, ‘माझी आई मला नेहमीच सांगते की कोणतीही गोष्ट फुकट घेऊ नये’ असं प्रांजळपणे सांगत मानुषीचे उपकार त्यानं नाकारले. ‘मी त्याला आइस्क्रीम देऊ केल्यावरही त्यानं ते नाकारलं, मला फुटबॉलपटू व्हायचं आहे त्यासाठी योग्य शरीरयष्टी असणं आवश्यक आहे’ असं कारण दिल्याचं मानुषीनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहलं आहे. महेशचा हा प्रामाणिकपणा मानुषीला खूपच भावला. या छोट्या मुलाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे, हा माझा नवीन मित्र आहे असं लिहित तिनं महेशचं भरभरुन कौतुक केलं आहे.

https://www.instagram.com/p/Bh9tjatha8j/