‘मिस वर्ल्ड’ हा किताब मिळवणारी हरयाणाची मानुषी छिल्लर नुकतीच भारतात परतली आहे. मायदेशी आल्यापासूनच मानुषी विविध कार्यक्रमांना हजेरी लावतेय. मिस वर्ल्ड मानुषीच्या स्वागतासाठी फक्त विमानतळावरच नव्हे तर मंत्रिमंडळातही बरीच उत्सुकता असल्याचे पाहायला मिळाले. म्हणूनच तिच्या स्वागतासाठी हरयाणा मंत्रिमंडळातील मंत्र्यांनीही हजेरी लावली होती. मानुषीच्या यशानंतर तिच्यावर स्थानिक प्रशासनाकडूनही बक्षीसांचा वर्षाव करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. मिस वर्ल्ड म्हणून तिची निवड होताच, हरयाणातील बामडोली या तिच्या मूळ गावात खाप पंचायतीतर्फे एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

त्याच निर्णयाविषयी आपले मतप्रदर्शन करत मानुषी म्हणाली, ‘गोष्टी बदलण्यास सुरुवात झाली आहे. मला गोष्टीचा फारच आनंद होतोय की, मिस वर्ल्ड म्हणून माझी निवड झाल्यानंतर हरयाणामध्ये लग्न सोहळ्याच्यावेळी हवेत केला जाणारा गोळीबार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.’ पुरुष प्रधान समाजाचं प्रतीक म्हणून केल्या जाणाऱ्या या गोळीबारामुळे अनेक दुर्घटनाही झाल्या आहेत. त्यामुळे ही मागास प्रथा बंद करण्याचा निर्णय खाप पंचायतीने घेतला आहे.

वाचा : जाणून घ्या मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा ‘डाएट प्लॅन’

एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या मानुषीने याच क्षेत्रात करिअर करण्याचा मानस असल्याचेही म्हटले. ‘डॉक्टर असो किंवा मिस वर्ल्ड तुमचा उद्देश सारखाच असतो. दोन्ही पेशातील व्यक्तींना समाजकार्य करायचे असते, असे ती म्हणाली.

https://www.instagram.com/p/BcCCO-UDR8D/

मानुषीने मिस वर्ल्ड किताब मिळवल्यापासूनच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार का, हा प्रश्नही अनेकांना पडला होता. पण, ‘सध्या मी जे काम करतेय त्यात मला फारच आनंद मिळतोय. मिस वर्ल्ड स्पर्धेतील इतर सौंदर्यवतींचीही मला यात साथ लाभणार आहे. त्यामुळे मला याच गोष्टीची फार उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे सध्या तरी हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याचा माझा कोणताही विचार नाही, असे मानुषीने स्पष्ट केले होते.