रेश्मा राईकवार

मिस यू मिस्टर

‘लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप’वर भाष्य करणारा चित्रपट अशी ‘मिस यू मिस्टर’ची ओळख करून देण्यात आली आहे. सध्या अनेक जोडपी सर्रास कामाच्या निमित्ताने एकमेकांपासून दूर राहताना दिसतात. त्यामुळे या दूर राहण्याचा त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होतो का आणि होत असेल तर ते कशा पद्धतीने त्यावर मात करतात हा खरंच समजून घेण्याचा विषय आहे. मात्र या चित्रपटातील जोडपे एकमेकांपासून दूर राहात असले तरी कथेत लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपचा विषयही दूरऽऽदूरच राहिलेला दिसतो.

कावेरी (मृण्मयी देशपांडे) आणि वरुण (सिद्धार्थ चांदेकर) हे दोघेही नवविवाहित जोडपे. वरुणला त्याचा व्यवसाय उभारण्यासाठी पैशाची गरज आहे आणि त्यासाठी कर्ज न काढता भांडवल उभारायचे या एकाच विचाराने तो लंडनमध्ये आलेला नोकरीचा प्रस्ताव स्वीकारतो. वरुणच्या जाण्याने कावेरी एकटी पडली आहे. खरे तर वरुणने परदेशात जाऊ  नये असेच कावेरीला वाटते आहे, मात्र त्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी कावेरी त्याची वाट अडवत नाही. वरुणच्या जाण्यानंतर कावेरी तिच्या सासू-सासऱ्यांबरोबर (राजन भिसे- सविता प्रभुणे ) एकत्र राहाते. सुरुवातीला येणारे नियमित कॉल्स, मग एकमेकांच्या वेळा सांभाळताना होणारी दमछाक, सासू-सूनेतील वाढत चाललेली दरी आणि त्याला कळतनकळत कारणीभूत ठरणारी कावेरीच्या आईची (राधिका विद्यासागर) अतिकाळजी अशा अनेक गोष्टी पूर्वार्धात पाहायला मिळतात. मात्र चित्रपट पाहताना त्यात निर्माण झालेल्या अडचणी या एकमेकांपासून दूर राहण्यातून आलेल्या आहेत, असे जाणवत नाही. किंबहुना, त्यांचे नाते बिनसण्याआधीच कावेरीची घालमेल सुरू होते. आणि ते केवळ वरुणने समजून न घेतल्याने नाही तर आपल्याकडे ज्या पद्धतीने मुलींनी लग्नानंतर सगळ्या जबाबदाऱ्या घेणे गृहीत धरले जाते, तिचे सासू-सासऱ्यांबरोबर एकत्र असणे, रुळणे या गोष्टी नवऱ्याकडूनही त्याच सहजतेने गृहीत धरल्या जातात. आणि इथेच गोंधळ होतो, जो कावेरीच्या बाबतीत जास्त जाणवतो.

पूर्वार्धापर्यंत निदान वरुणच्या परदेशात असण्यापर्यंतची कथा उत्तरार्धात तर आणखीनच विषयापासून भरकटली आहे. मुळात वरुण आणि कावेरी आपल्या ध्येयाबद्दल, आपण जे ठरवले आहे त्याबद्दल ठाम आहेत. शिवाय, आत्ताच्या घडीला एकमेकांच्या संपर्कात राहणे फारसे अवघड नाही, त्यामुळे त्यांच्यात संवादच होत नाही, असेही नाही. अनेकदा एकमेकांवरच्या रागातून संवाद साधणे टाळले जाते. त्यामुळे मुळात वरुण आणि कावेरीमधला विसंवाद हा त्यांच्या एकमेकांपासून दूर राहण्यामुळे नाही हेच सातत्याने जाणवत राहते. बाकी सर्वसामान्यपणे दोन्हीकडच्या कुटुंबांनी अशा परिस्थितीत जो गोंधळ घातला असता तोच इथे ते घालताना दिसतो. म्हणजे दोन्हीकडून कोणीतरी समजून घेऊ  शकेल, अशी परिस्थिती नक्कीच असते हा विचार मेंदू कुरतडत असला तरी वास्तवात अनेकदा हा आदर्शवाद विचारांतच असतो हे अनुभवायला मिळते. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून समीर हेमंत जोशी यांनी हा आदर्शवादाचा मोह टाळला तेच बरे झाले. चित्रपटाची वास्तव मांडणीची शैली चांगली असली तरी त्याचा संथपणा आणि ताणलेली गोष्ट यामुळे त्याचा प्रभाव आणखी कमी होत जातो. हृषिकेश जोशी यांच्या व्यक्तिरेखेला आणखी वेळ आणि ठोस भूमिका देता आली असती. कावेरीच्या बहिणीची (दिप्ती लेले) भूमिकाही अशीच उतावळी आणि गोंधळलेली दिसते. एकुणातच या पसाऱ्यात त्या क्षणी तरी वादाचा केंद्रबिंदू असली तरी भानावर असलेली कावेरी ही एकच व्यक्तिरेखा दिसते. कथेतले हे गोंधळलेपणच चित्रपटाला जास्त मारक ठरले आहे.

चित्रपटातील मुख्य जोडीसह सगळेच कलाकार चांगले आहेत. बऱ्यापैकी चित्रपट सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे या जोडीच्या खांद्यावर आहे. त्यांनी तो त्यांच्या सहजतेने पेलून धरला आहे. एकमेकांपासून दूर राहात असल्याने असेल कदाचित या दोघांमध्ये अगदी एक-दोन प्रसंग वगळता रोमँटिक क्षण नाहीत. तुलनेने सिद्धार्थच्या वरुणपेक्षा कावेरीच्या भूमिकेला जास्त कंगोरेही आहेत आणि मांडणीतही ती उजवी वाटते. मृण्मयीने हे सगळे कंगोरे उत्तम वठवले आहेत. अगदी वरुण परतल्याची चाहूल लागल्यावरचे दृश्यही तिने अप्रतिम साकारले आहे. तिची तगमग, घुसमट, ओढ सगळेच त्यातून व्यक्त होते. सिद्धार्थचे असणेच वरुणच्या एकंदरीत वावरण्याला प्रसन्नता देऊन गेले आहे. इतरांमध्ये त्यातल्या त्यात कावेरीच्या वडिलांच्या भूमिकेत असलेल्या अविनाश नारकर आणि राजन भिसे यांच्या वाटय़ाला एखादाच शहाणपणाचा प्रसंग आला आहे. बाकी गाणी, संवाद या बाबतीत चित्रपट फारसा चमकदार ठरलेला नाही. मूळ कथेतच विषयाला मिस केल्यामुळे असेल कदाचित चित्रपट ना मनोरंजक ठरतो ना वास्तव विषयाच्या बाबतीत काही वेगळे देऊन जातो. चांगल्या विषयावरचा मराठीतला आणखी एक ताजा चित्रपट इतकेच काय ते म्हणता येईल..

दिग्दर्शक- समीर हेमंत जोशी

कलाकार- मृण्मयी देशपांडे, सिद्धार्थ चांदेकर, राजन भिसे, सविता प्रभुणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर, दिप्ती लेले आणि हृषिकेश जोशी.