30 March 2020

News Flash

चित्र रंजन : मंगलदायक अनुभव

मंगळयान मोहिमेत महिला वैज्ञानिकांचा सहभाग खूप महत्त्वाचा होता.

(संग्रहित छायाचित्र)

रेश्मा राईकवार

मिशन मंगळ

एरव्ही भारतीय मुलींच्या कुंडलीत पीडादायक ग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहावर स्वार होण्याचे स्वप्न काही भारतीय स्त्री वैज्ञानिकांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पूर्ण झाले ही कथा नवल वाटावी अशीच आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यान पाठवण्यात यशस्वी ठरलेला देश म्हणून भारताला लौकिक मिळवून देणाऱ्या मार्स ऑर्बिटर मिशनची (मॉम) कथा सांगणारा हा चित्रपट त्यामागे असलेल्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांची शिकस्त दाखवून देतो. भव्यदिव्य शोधाच्या जन्माची कथा सांगताना त्याच्या मागे असलेली बुद्धी, निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द यांचा मंगलदायक कथानुभव देणारा हा चित्रपट आहे.

अतिशय कमी खर्च, साधे तंत्रज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घालत जगभरातूनच काय खुद्द आपल्याच देशात होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करून इस्रोमधील वैज्ञानिकांनी मंगळावर झेप घेण्याचे हे शिवधनुष्य पेलले. ५ नोव्हेंबर २०१३ रोजी श्रीहरिकोटामधून मंगळयान अवकाशात झेपावले आणि मंगळयान मोहिमेतील सगळ्या अमंगळ गोष्टींवर मात करत २४ सप्टेंबर २०१४ रोजी मंगळग्रहाच्या कक्षेत प्रवेश करत भारताने अंतराळ इतिहासात एक नवा विक्रम रचला. मंगळयान मोहिमेची ही गोष्ट नक्कीच प्रेरणादायक आहे. मात्र विजयाचा तो एक क्षण तेवढाच महत्त्वाचा नसतो. त्याचा विचार रुजला तो क्षण, तो विचार प्रत्यक्षात उतरवण्याचा ध्यास घेणाऱ्यांचा प्रवास, त्यांच्या वाटेतील अडथळे अशा अनेक गोष्टी त्या विजयासाठी कारणीभूत असतात. कधीकधी कवडीमोल वाटणाऱ्या कल्पनाही अभ्यास आणि प्रयत्नांच्या जोरावर सोनेरी यश मिळवून जातात. मंगळयान मोहिमेमागे असणाऱ्या याच घटना आणि सर्वसामान्य आयुष्य जगतानाही असामान्य बुद्धीच्या जोरावर देशाला पुढे नेणाऱ्या वैज्ञानिकांचे प्रयत्न यावर भर देत दिग्दर्शक जगन शक्ती यांनी हे मिशन मंगल पडद्यावर साकारले आहे.

त्या वैज्ञानिक आहेत, पण तरीही इस्रोतील आपले काम पूर्ण करून घरी परतणारी ती कोणी आई आहे, कोणा सैनिकाची पत्नी आहे, कोणी बिनधास्त राहणारी नासात काम करण्याचे ध्येय बाळगणारी तरुणी आहे. काहीच नाही तर आपल्या अभ्यासातून छोटय़ाशा घराला ऐसपैस आकार देणारी, मात्र आपल्याला नातू देऊ  शकत नाही म्हणून सासूचे टोमणे ऐकणारी सूनही आहे. इथे या जागा प्रोजेक्ट हेड म्हणून तारा शिंदे (विद्या बालन), एका गांधी (सोनाक्षी सिन्हा), गाडी चालवतानाही घाबरणारी क्रितिका (तापसी पन्नू), डिझाईन करणारी वर्षां पिल्लाई (नित्या मेनन), मुस्लीम असल्याने साधे घरही न मिळू शकणारी नेहा सिद्दिकी (कीर्ती कुलहारी), विवाह कुंडलीत मंगळ ग्रह आडवा आल्याने त्यापासून दूर पळणारा परमेश्वर (शर्मन जोशी), सगळ्यात तरुण तुर्क  अनंत अय्यर (दत्तात्रेय) आणि या सगळ्यांची मोट बांधणारे मिशन प्रमुख राकेश धवन (अक्षय कुमार) यांनी भरून काढल्या आहेत. ‘मिशन मंगल’ चित्रपटाला आकार देणाऱ्या या मुख्य आणि तितक्याच प्रभावी व्यक्तिरेखांमुळे ही गोष्ट प्रेक्षकांना अधिक जवळची वाटते, आपलीशी वाटते. या मांडणीचे श्रेय दिग्दर्शकाला जाते.

मंगळयान मोहिमेची किचकट गोष्ट, त्यातली गुंतागुंत लक्षात घेऊनही सामान्यांना ऐकावीशी वाटेल, पाहावीशी वाटेल अशा रंजक पद्धतीने साकारणे हे दिग्दर्शकासमोरचे मोठे आव्हान होते. इथे लेखक म्हणून दिग्दर्शक आर. बाल्की यांचा उल्लेखही महत्त्वाचा वाटतो. अनेकदा हिंदी चित्रपटांमध्ये साय-फाय गोष्टी पाहताना त्यातील व्हीएफएक्स जाणवते आणि त्यामुळे ते चित्रण बेगडी वाटते. तसाच प्रकार इथेही होण्याची शक्यता होती, मात्र वास्तवाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करताना तंत्रात्मक भागावर जास्त लक्ष देण्यापेक्षा त्याच्याशी जोडल्या गेलेल्या माणसांवर लेखक-दिग्दर्शकाने जास्त लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे इस्रोचे काम, त्याचा आवाका आणि एकूणच वैज्ञानिक संशोधन याची झलक पाहायला मिळते. अगदी मंगळयानाचे प्रक्षेपण, त्याची रचना याही गोष्टी तितक्या प्रभावी वाटत नाहीत. मात्र प्रत्यक्ष मंगळयान आकाराला येऊन ते प्रक्षेपित होईपर्यंत आपण त्या गोष्टीत इतके सहज गुंतलेलो असतो की, बाकीच्या गोष्टी फारशा जाणवत नाहीत.

प्रथेप्रमाणे इथेही चित्रपटाचा नायक अक्षय कुमारच आहे, मात्र त्याचा प्रभाव एकतर इतक्या अभिनेत्रींच्या फौजेने कमी केला आहे. त्यातही विद्या बालन ही या चित्रपटाची खरी नायिका ठरली आहे. पुरी तळताना गॅस वाचवण्याची युक्ती मंगळयानासाठी वापरण्याचा विचार इस्रोच्या वैज्ञानिकांसमोर मांडण्यापासून ते हे मिशन तुमचे वैज्ञानिक बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकते हे टीमला पटवून देणारी वैज्ञानिक तारा म्हणूनही ती त्याच सहजतेने वावरते. आणि त्याच उत्साहाने घरी सतत मुलांवर वैतागणाऱ्या नवऱ्याला समजून घेत, मुलांचे प्रश्न सोडवणारी आई दिसते. विद्याने या भूमिकेत चौफेर फटकेबाजी केली आहे. बाकी सगळ्याच कलाकारांनी उत्तम काम केले आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनाही इतक्या मोठय़ा आणि महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणे ही पर्वणी आहे. देशाच्या इतिहासात किंबहुना अंतराळाच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिली गेलेली ही घटना पडद्यावर पाहण्याचा मंगलदायक अनुभव मिशन मंगल देतो.

* दिग्दर्शक – जगन शक्ती

* कलाकार – विद्य बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, किर्ती कुलहारी, नित्या मेनन, अक्षय कुमार, शर्मन जोशी, दत्तात्रेय, विक्रम गोखले, दिलीप ताहिल, पूरब कोहली, झीशान अय्यूब.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2019 12:16 am

Web Title: mission mangal movie review abn 97
Next Stories
1 “वाहतूक कोंडीतील वाहनांमध्येच नागरिकांची स्मारकं उभी राहणार”
2 Raksha bandhan 2019 : साराने शेअर केला भावासोबतचा खास फोटो
3 अक्षय कुमार ‘या’ अभिनेत्रीसाठी बनला मेकअप आर्टिस्ट
Just Now!
X