अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनी आपण करोनाबाधित असल्याची माहिती आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरुन दिली. हे दोघेही कायमच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. आता अशी माहिती समोर येत आहे की, हे दोघेही एकत्र एका चित्रपटाचं चित्रीकरण करत होते.

FWICE म्हणजे फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयी या संघटनेचे सचिव अशोक दुबे यांनी टाईम्सला ही माहिती दिली. ते म्हणाले, “विकी आणि भूमी हे दोघेही ‘मिस्टर लेले’ या चित्रपटाचं चित्रीकऱण करत होते आणि आता त्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने काम थांबवलं आहे. सेटवरच्या अन्य काही कलाकारांचीही करोना चाचणी करण्यात आली. मात्र ती निगेटिव्ह आली आहे.”

रविवारी, अभिनेता अक्षय कुमारलाही करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्याला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तो ‘रामसेतू’ या चित्रपटाचं चित्रीकरण करत होता. आता त्या चित्रपटाचंही काम थांबलं आहे. याच सेटवरच्या इतरही काही कलाकारांना करोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. म्हणूनच FWICE या संघटनेने सेटवर अधिकाधिक काळजी घेण्याचे धोरण अवलंबले आहे.

संघटनेचे सचिव दुबे म्हणाले, “आम्ही सर्व निर्मिती संस्थांना फाईट सीन आणि नृत्याचं चित्रीकरण थांबवण्याचं आवाहन केलं आहे. आम्ही सरकारच्या सर्व नियमांचं पालन करत आहोत. सर्वांना आम्ही आरटीपीसीआर चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह येईल त्यांना वगळून इतरांनी काम करावे, त्यासाठी चित्रीकरण थांबवू नये असे आवाहनही केले आहे.”