सरते वर्ष बॉलीवूडसाठी ‘सरप्राईज’ ठरले.  मेगास्टार अभिनेत्यांच्या सिनेमांनी १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला,  तर ‘ऑफबीट’ चित्रपटांनी बॉलीवूडचा चेहरामोहरा बदलून टाकला. २०१२ हे वर्ष ‘मिक्स बॅग’ म्हणून गणता येईल. हिंदी चित्रपटांचा गाणे-हाणामारी हा नायककेंद्री फॉम्र्युला सलमान खानचे चित्रपट वगळता अन्य चित्रपटांमध्ये चालला नाही. ‘मॅड कॉमेडी’ प्रकार बॉलीवूडमध्ये रोहित शेट्टीने रुजवला असला, तरी ‘बोलबच्चन’ वगळता हा फॉम्र्युलाही फारसा यशस्वी ठरला नाही. शम्मी कपूर, यश चोप्रा, देव आनंद, बी. आर. इशारा असे दिग्गज काळाच्या पडद्याआड गेले. त्या अर्थाने गेल्या वर्षभरात बॉलीवूडने अनेक दिग्गजांना गमावले. परंतु, फक्त चित्रपटांचा विचार केला तर ‘मिक्स बॅग’ ठरलेले हे वर्ष भविष्यातही तसेच राहणार आहे असे दिसतेय.
सीक्वल आणि इक्वल
‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई’, ‘रेस’, ‘क्रिश’, ‘रागिणी एमएमएस’, ‘मर्डर’ अशा चित्रपटांचे पहिले किंवा दुसरे सीक्वलपटही २०१३ सालात प्रेक्षकांसमोर येणार असून, सलमान खानचा ‘दबंग ३’ हा चित्रपटही येण्याची शक्यता आहे. ‘तलाश’च्या यशानंतर आमिर खान पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळणार असल्याचे चिन्ह आहे. ‘चेन्नई एक्स्प्रेस’द्वारे शाहरूख-दीपिका पडद्यावर येतील. बिग बजेट-बडे कलावंत- कर्णमधुर संगीत- नामवंत निर्माता-दिग्दर्शक हा बॉलीवूडचा ठरीव फॉम्र्युला बदलतोय आणि आगामी काळातही बदलत राहणार असे २०१३ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांवरून सहजपणे लक्षात येईल. तद्दन बॉलीवूड फॉम्र्युलाबाज चित्रपटांना फाटा देत वेगळ्याच विषयांवरचे आणि वेगळ्या पद्धतीची हाताळणी असलेले चित्रपट आता येत राहणार आहेत. संजय लीला भन्साळीचा ‘राम लीला’, तिग्मांशू धुलिया दिग्दर्शित अंडरवर्ल्ड आणि उत्तर प्रदेशातील माफियांवर आधारित ‘बुलेट राजा’, विद्या बालनचे ‘घनटक्कर’ आणि ‘शादी के साईड इफेक्ट्स’ तसेच फरहान अख्तरचा ‘भाग मिल्खा भाग’ हा मिल्खासिंग यांच्यावरील चित्रपट हेही २०१३ चे वेगळेपण ठरावे.
येणारे चित्रपाहुणे..
जानेवारीत ‘देहराडून डायरी’, ‘राजधानी एक्स्प्रेस’, ‘आकाश वाणी’, कमल हसनचा ‘विश्वरूप’, सैफ अली खान-दीपिका पदुकोण-जॉन अब्राहम यांचा ‘रेस २’ असे ठरीव आणि वेगळ्या पठडीतले बहुतांशी नवोदित कलावंत-दिग्दर्शकांचे चित्रपट झळकणार आहेत. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’प्रमाणेच प्रेमकथापट म्हणून ‘आकाश वाणी’ हा चित्रपट गाजेल, अशी शक्यता आहे. बिग बजेट आणि बडय़ा कलावंतांचे बहुतांशी चित्रपट दिवाळी आणि डिसेंबर-जानेवारी अशा मोसमात प्रदर्शित केले जातात. परंतु, फक्त मधल्या फळीतील इमरान खान, इमरान हाश्मी, अजय देवगण, जॉन अब्राहम आणि अनेक नवोदित कलावंतांचे चित्रपट अन्य मोसमात प्रदर्शित होणार आहेत.
जानेवारीतील चित्रप्रदर्शन
देहराडून डायरी, राजधानी एक्स्प्रेस, टेबल नंबर २१, फोर टू का वन, गंगूबाई, मटरू की बिजली का मंडोला, विश्वरूप, मुंबई मिरर, आकाश वाणी, इन्कार, रेस झ्र्२
रिमेक चित्रपट : अमिताभच्या गाजलेल्या ‘जंजीर’ चित्रपटाचा रिमेक त्याच नावाने येणार असून सई परांजपे दिग्दर्शित ‘चष्मेबद्दूर’ या गाजलेल्या चित्रपटाचा रिमेकही ‘चष्मेबद्दूर रिमेक’ नावाने येणार आहे. हा चित्रपट डेव्हिड धवन दिग्दर्शित करणार आहे.
आगामी ‘ चर्चील’ चित्रपट :   जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत असलेले ‘शूटआऊट अ‍ॅट वडाळा’ आणि ‘आय, मी और मैं’ या चित्रपटांची हवा २०१२ मध्येच निर्माण झाली आहे.