देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी महाराष्ट्रात लॉकडाउनचा निर्णय घेऊन नियमावली कठोर करण्यात आली. लॉकडाउनच्या काळात अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यामध्ये मालिका, सिनेमांच्या चित्रिकरणावर पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे. त्यामुळे मनोरंजनाला ब्रेक लागू नये आणि प्रेक्षकांचं मनोरंजन अविरत सुरु राहावं म्हणून झी मराठीवरील मालिकांचं चित्रिकरण महाराष्ट्राबाहेरील राज्यात हलवावं लागलं. सध्या ‘चला हवा येऊ द्या’चं शूट जयपूर मध्ये सुरु आहे.

आता ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात एक नवीन एण्ट्री होणार आहे. त्यामुळे कार्यक्रमाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहयला मिळते. कार्यक्रमात ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम आणि राधिका मसालेची सर्वेसर्वा अनिता दातेची एण्ट्री होणार आहे. अनिता आता ‘चला हवा येऊ द्या’च्या हास्यवीरांसोबत विनोद करताना दिसणार आहे.

तसेच ‘चला हवा येऊ द्या’च्या या आठवड्यातील वैशिष्ट्य म्हणजे स्वप्नील जोशीने वाढता करोनाचा प्रादुर्भाव, ऑक्सिजन आणि राजकारणावर भाष्य करणारे पत्र वाचन केलं, तेव्हा तेथे उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले आहेत. आता ‘चला हवा येऊ द्या’मध्ये अनिताला पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.