ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक एम. के. अर्जुनन यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. कोची येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक होते. ऑस्कर पुरस्कार विजेते ए. आर. रेहमान यांना १९८१ मध्ये अर्जुनन यांनी कामाची पहिली संधी दिली होती.

संगीतातील त्यांच्या अभूतपूर्व कामगिरीमुळे त्यांना अर्जुनन मास्टर म्हणूनही संबोधलं जातं. जवळपास २०० चित्रपटांमधील ७०० हून अधिक गाण्यांना त्यांनी संगीतबद्ध केलं आहे. लहानपणापासूनच त्यांनी संगीतात रुची होती.

चित्रपटांसोबतच त्यांनी नाटकांनाही संगीत दिलं. जवळपास ३०० नाटकांमधील ७५० गाण्यांना त्यांनी संगीतबद्ध केलं. १९८१ मध्ये ‘आदिमाचंगाला’ या चित्रपटातील गाण्यासाठी त्यांनी ए. आर. रेहमान यांना पहिली संधी दिली होती. एम. के. अर्जुनन यांच्या निधनाच्या वृत्ताने मल्याळम चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियाद्वारे अनेकांनी त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.