सिनेसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना जाहीर झाला. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रजनीकांत यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव केला जाणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर सर्वांनीच रजनीकांत यांना सोशल मीडिया पोस्टद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सोशल मीडिया पोस्टद्वारे रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राज ठाकरे यांनी फेसबुक अकाऊंटवर रजनीकांत यांचा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहीली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘रजनीकांतना काहीच अशक्य नाही, असं त्यांच्या चाहत्यांना वाटणं योग्यच, पण अशा आशयाचे हलकेफुलके विनोद त्यांचे सिनेमे फारसे न पाहिलेला पण हिरहिरीने एकमेकांना पाठवतो. ज्या अभिनेत्याचं देऊळ उभारलं जाऊन, रजनीकांत ह्या व्यक्तीला जवळपास देवाच्या जवळ नेऊन त्यांचा एक पंथ निर्माण होतो, आणि इतकं असताना हाच अभिनेता अपूर्व प्रसिद्धीच्या झोतात देखील सिनेमातील पात्राची झूल उतरवून सामान्य माणसासारखा जगू शकतो असा हा एकमेवाद्वितीय सुपरस्टार. रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या हा अभिनेत्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन’ असे म्हटले आहे.

सिनेसृष्टीत महत्वाची कामगिरी करणाऱ्या अभिनेत्याला दरवर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं जात. यंदाचा हा पुरस्कार सुपरस्टार रजनीकांत यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. त्याचसोबत त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. ” भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेता रजनीकांतजी यांना 2019 सालातील दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करताना आंनद होत आहे. त्यांचं अभिनेता, निर्माता आणि पटकथा लेखक म्हणून असलेलं योगदान महत्वाचं आहे” असं ट्वीट करत प्रकाश जावडेकर यांनी ज्यूरी सदस्यांचे आभार मानले आहेत.