ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांच्या निधनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निर्भीडपणे सामाजिक विषयांवर ठाम भूमिका घेणाऱ्या ह्या प्रतिभावान कलाकाराची नक्कीच उणीव भासेल. गिरीश कर्नाडांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

गिरीश कर्नाड यांचे सोमवारी सकाळी बंगळुरुतील निवासस्थानी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनावर सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. राज ठाकरे यांनी देखील कर्नाड यांच्या निधनावर शोक व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. “इतिहास आणि मिथकं ह्यांच्या गुंफणातून समकालीन प्रश्नांवर भाष्य करणारी नाटकं ही गिरीश कर्नाडांनी स्वातंत्र्योत्तर भारतीय रंगभूमीला दिलेली ठेव असून मराठी भाषेवर, रंगभूमीवर मातृभाषेइतकंच मनस्वी प्रेम करणारे कर्नाड हे मराठी आणि कन्नड ह्या भगिनी भाषांमधल्या विचारप्रवाहांचे वाहक होते. निर्भीडपणे सामाजिक विषयांवर ठाम भूमिका घेणाऱ्या ह्या प्रतिभावान कलाकाराची नक्कीच उणीव भासेल. गिरीश कर्नाडांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन, असे ट्विट राज ठाकरेंनी केले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कर्नाड यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. गिरीश कर्नाड यांच्या निधनाने साहित्य, कला आणि वैचारिक क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्व आपण गमावले. साहित्य, चित्रपट, रंगभूमी यासह वैचारिक क्षेत्रातही त्यांचा समर्थ वावर होता. विशेषत: एक महान रंगकर्मी म्हणून त्यांचे भारतीय नाट्यक्षेत्रातील योगदान सदैव स्मरणीय असेल. ज्ञानपीठ, कालिदास सन्मान, साहित्य अकादमी, संगीत अकादमी यांच्यासह विविध प्रतिष्ठेचे पुरस्कार व नागरी सन्मानांनी झालेला गौरव हा त्यांच्या कार्याचे महत्व विशद करणारा आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.