बिग बॉसचा १४ वा सीझन सुरू आहे. या सीझनमध्ये स्पर्धकांमध्ये रोज नवनवे वाद पाहायला मिळत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तांबोळी यांच्या वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. या वादादरम्यान राहुल वैद्यला बोलताना जान कुमार सानू यानं मराठी भाषेबद्दल काही आक्षेपार्ह शब्द उच्चारले. दरम्यान, हा भाग प्रकाशित झाल्यानंतर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला होता. त्यानंतर आता मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनीदेखील जान कुमार सानूला इशारा दिला आहे. जान कुमार सानूच्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत असून त्याची बिग बॉसमधून हकालपट्टी करण्याची मागणीही होत आहे.

आणखी वाचा- समजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय?

सध्या जान कुमार सानूचं वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी त्याच्या वक्तव्याबाबत संताप व्यक्त केला आहे. “माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते,” असं जान कुमार सानू म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्यानंतर मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी इशारा दिला. “मराठीचा अपमान केलास… आता कुमार सानूची ‘जान’ वाचणं कठीण आहे!,” असं शालिनी ठाकरे म्हणाल्या.

आणखी वाचा- मुंबईत राहून आता तुझं करिअर कसं बनतं तेच पाहतो; अमेय खोपकरांचा बिग बॉसच्या स्पर्धकाला इशारा

अमेय खोपकरांनीही दिला इशारा

अमेय खोपकर यांनीदेखील जान किशोर सानूला कठोर शब्दात इशारा दिला आहे. “जान कुमार सानू… मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी… मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला,” असं अमेय खोपकर म्हणाले.
“मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. आता आम्ही मराठी लवकरच तुला थोबडवणार. कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं,” असं म्हणत खोपकर यांनी जान सानू याला धमकीवजा इशारा दिला.