News Flash

निवडणुकीच्या काळात ‘पीएम नरेंद्र मोदी’ प्रदर्शित झाल्यास खळ्ळ-खट्यॅक: मनसे

समाजातील किंवा सिनेक्षेत्रातील प्रतिष्ठित लोक मोदी यांच्यावरील सिनेमासाठी आपलं योगदान देत आहेत, असा एक समज या सिनेमाच्या 'पडद्यामागील' लोकांना जाणीवपूर्वक पसरवायचा आहे.

संग्रहित छायाचित्र

विवेक ओबेरॉय याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटावर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने आक्षेप घेतला आहे. हा सिनेमा ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचं पालन सर्वांनी करावं, असं अपेक्षित असताना सत्ताधारी पक्षच जर आचारसंहितेला असे पायदळी तुडवणार असेल तर हा गैरप्रकार रोखण्यासाठी मनसेला खळ्ळ-खट्यॅक करावं लागेल, असा इशाराच संघटनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी दिला आहे.

आगमी लोकसभा निवडणुकांच्या काळात बहुप्रतिक्षित असा ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा बायोपिक प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात विवेक ओबेरॉयने प्रमुख भूमिका साकारली आहे. निवडणुकीच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित करण्यावर बंदी घालावी, अशी मागणी काँग्रेस व डीएमकेने केली होती. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही या मुद्द्यावरुन आक्रमक झाली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या शालिनी ठाकरे यांनी प्रसिद्धीपत्रक काढून या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. शालिनी ठाकरे म्हणतात, गेल्या वर्षीच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मोदी-भाजपाने सरकारी योजनांच्या प्रचारासाठी अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ आणि ‘पॅडमॅन’ या दोन सिनेमांना पक्षामार्फत निधी उपलब्ध करून दिल्याचा आरोप केला होता. या घटनेला एक वर्ष उलटत नाही तोच आणखी एक मोठा ‘पराक्रम’ भाजपवाल्यांनी करून दाखवला आहे. समाजातील किंवा सिनेक्षेत्रातील प्रतिष्ठित लोक मोदी यांच्यावरील सिनेमासाठी आपलं योगदान देत आहेत, असा एक समज या सिनेमाच्या ‘पडद्यामागील’ लोकांना जाणीवपूर्वक पसरवायचा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना या गलिच्छ प्रचाराचा जाहीर निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.

या सिनेमातील गाणी ख्यातनाम गीतकार जावेद अख्तर आणि समीर यांनी लिहिल्याचं जाहीर करण्यात आलं. सिनेमाच्या अधिकृत पोस्टरवर तसा त्यांचा नामोल्लेख करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र, जावेद अख्तर आणि समीर या दोघांनीही या सिनेमासाठी गीतलेखन केलेलं नाही. तसं त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे, याकडे शालिनी ठाकरेंनी लक्ष वेधले. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी देखील या चित्रपटावर आक्षेप घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2019 1:34 pm

Web Title: mns oppose pm narendra modi movie release during lok sabha election
Next Stories
1 photo : कंगनाच्या बालपणीचा फोटो शेअर करत रंगोलीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
2 Video : बाकी सब फर्स्ट क्लास है!
3 बायोपिकमध्ये कंगना रणौत साकारणार जयललिता यांची भूमिका
Just Now!
X