आगामी मराठी चित्रपटांना थिएटरमध्ये योग्य वेळेचे शो मिळावेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुण्यात प्रभात सिनेमागृहाबाहेर आंदोलन करण्यात आले. दिवाळीच्या मुहूर्तावर २४ ऑक्टोबरला ‘हिरकणी’ तर २५ ऑक्टोबरला ‘ट्रिपल सीट’ हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. तर याच आठवड्यात तीन मोठे हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हिंदी चित्रपटांमुळे मराठी चित्रपटांना पुरेसे स्क्रीन्स मिळत नसल्याची तक्रार अनेकदा कलाकारांनी केली. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने खळखट्याकचा इशारा दिला आहे.

‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेता रमेश परदेशीसुद्धा या आंदोलनात सहभागी झाला. ‘मराठी चित्रपटांना शो मिळण्यास अडचणी येऊ नयेत. कारण त्यांना हे नुकसान परवडण्यासारखे नाही. ‘ट्रिपल सीट’ व ‘हिरकणी’ला योग्य वेळेचे शो मिळावेत’, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली. ही मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करावं लागेल आणि त्याची जबाबदारी थिएटर चालकांची असेल, अशा इशारासुद्धा मनसेनं यावेळी दिला.

२५ ऑक्टोबर रोजी ‘ट्रिपल सीट’सोबतच ‘सांड की आँख’ आणि ‘मेड इन चाइना’ हे दोन हिंदी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. तर २६ ऑक्टोबरला ‘हाऊसफुल ४’ प्रदर्शित होत आहे. मराठी चित्रपटांचा चांगला आशय असूनही चित्रपटगृह उपलब्ध होणे कठीण होत असल्याने मनसेनं खळखट्याकचा इशारा दिला आहे.