दिलखूलास अंदाज, हटके स्टाइल आणि गावगुंडांना धाकात ठेवण्याची अनोखी पद्धत या साऱ्यामुळे प्रेक्षकांची ज्याने मने जिंकली तो चुलबूल पांडे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता सलमान खानची मुख्य भूमिका असलेला दबंग फ्रेंचाईजीमधील तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘दबंग २’ नंतर तब्बल सात वर्षांनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे.

दरम्यान या चित्रपटात दिग्दर्शक, अभिनेता महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती सलमानच्या कॉलेज जीवनातील प्रेयसीची भूमिका पार पाडणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटातील सईचा लूक सर्वांपासून लपवून ठेवण्यात आला आहे. ‘दबंग ३’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सईचा लूक लीक होऊ नये यासाठी मेहनत घेतली जात आहे. विशेष म्हणजे सलमानने सईचा लूक लीक होऊ नये म्हणून सेटवर मोबाईल फोनवर बंदी आणली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चित्रीपटाच्या चित्रीकरणादरम्यान सईला सार्वजनिक ठिकाणी जाण्यासही बंदी आणली आहे. लवकरच सलमान स्वत: सईचा लूक सोशल मीडियावर शेअर करणार असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटाच्या सेटवर येण्यापूर्वी सर्वांचे मोबईल फोन जमा करण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे.

‘दंबग ३’ हा प्रिक्वल असून यात चुलबूल पांडेची कौटुंबिक पार्श्वभूमी दाखवण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत तर दुसरीकडे हा चित्रपट नोएडामधल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनातील सत्य घटनांवर आधारित असल्याचेही म्हटले जात आहे. प्रभुदेवा दिग्दर्शित सलमान खानचा हा चित्रपट २० डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.