८०चे दशक – गावात एक टीव्ही

९०चे दशक – गल्लीत एक टीव्ही

२०००- घरटी एक टीव्ही

२०१७ पासून पुढे – माणशी एक टीव्ही तोही मोबाइलवर..

देशात दूरचित्रवाणीची क्रांती जितक्या धीम्या गतीने झाली त्याच्या उलट जलद वेगाने डिजिटल माध्यमाची क्रांती झाली. देशात सर्वात प्रथम १९५९ मध्ये दूरचित्रवाणी संच आला. तेव्हापासून पुढची तब्बल ३० वष्रे एकच वाहिनी ठरावीक वेळेवर दिसायची. मग हीच वाहिनी २४ तास दिसू लागली. पण १९९१मध्ये जागतिकीकरणानंतर मात्र अनेक परदेशी गुंतवणूकदार देशात आले आणि त्यांनी इतर क्षेत्राप्रमाणेच मनोरंजन क्षेत्रातही क्रांती घडवली. दूरचित्रवाणी संच स्वस्त झाले व ते घराघरांत पोहचू लागले. १९९२मध्ये देशातील बारा लाख घरांमध्ये दूरचित्रवाणी संच होता. यानंतर ही संख्या झपाटय़ाने वाढत गेली व घराघरांत दूरचित्रवाणी संच पोहोचला.

१९९१ मध्ये देशात एकच वाहिनी होती त्याची जागा आता चोवीस तास मनोरंजन उपलब्ध करून देणा-या तब्बल ८०० वाहिन्यांनी घेतली. पण आता या चित्रवाणी संचाच्या पलीकडे जाऊन एक नवीन पडदा समोर आला आहे. यामध्ये प्रेक्षकांना दूरचित्रवाणीवरील पर्यायांपेक्षा अनेक वेगळे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याच माध्यमांना टीव्हीची मोबाइल आवृत्ती असे म्हटले जाऊ लागले आहे. मोबाइलवर मनोरंजनाचे व्हीडिओज मिळणे हे तसे नवीन नाही. याला साधारणत: पाच वर्षांपूर्वी सुरुवात झाली. यू ट्युब तसेच तशा इतर संकेतस्थळांच्या माध्यमातून इंटरनेट व्हीडिओज लोकांपर्यंत पोहचू लागले.

ज्याप्रमाणे मोबाइल क्रांती होत आहे, स्वस्तात इंटरनेट सुविधा उपलब्ध होत आहेत त्या प्रमाणात या ग्राहकांची संख्याही वाढत जाणार आहे. या ग्राहकांना आकर्षति करण्यासाठी अनेक मुख्य वाहिन्यांनी त्यांच्या मालिका एका अ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या. यामुळे प्रेक्षक आपल्या वेळेनुसार हवी ती मालिका पाहू शकत होता. पण टीव्हीवरील त्याच मालिका मोबाइलमध्येही का पाहायाच्या असा प्रश्न अनेकांना पडू लागला आणि भारतीय वाहिन्यांच्या या रूपांतरीत ‘डिजिटल व्हीडिओ’कडे लोकांनी पाठ फिरविण्यास सुरुवात केली. मग लोकांनी परदेशातील ‘नेटफ्लिक्स’चा पर्याय वापरण्यास सुरुवात केली. याच स्पध्रेत ‘अ‍ॅमेझॉन प्राइमने’ही उडी घेतली. या आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबरच सोनी लिव्ह, वेब टॉकिजसारख्या देशी कंपन्याही स्वत:ची वेब वाहिनी घेऊन बाजारात दाखल झाल्या आहेत.

डिजिटल मनोरंजन वाहिनी

इंटरनेटमुळे सारं काही डिजिटल होऊ लागलं. या स्पध्रेत टिकण्यासाठी टीव्हीलाही डिजिटल आणि स्मार्ट व्हावं लागलं. त्याच्या या बदलामुळेच आजही बहुतांश शहरी घरांमध्ये टीव्हीचा आवाज ऐकू येतोय. आपली कला जगासमोर नेण्यासाठी इंटरनेटचा प्रभावी वापर करून घेण्यासाठी स्मार्ट पिढी विविध पर्यायांचा वापर करू लागली. यासाठी गुगलने ‘युट्युब’सारखे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या व्यासपीठावर कुणीही वापरकर्ता त्याला पाहिजे ते व्हीडिओज पाहू शकतो व अद्ययावत करू शकतो. पण ‘युट्युब’ स्वत: कोणतेही व्हीडिओज तयार करत नाहीत. यामुळे यामध्ये खूप गर्दी जमली. या गर्दीत दर्दीमाणूस काही टिकेनासा झाला. मग एखादी मनोरंजन वाहिनी ज्याप्रमाणे काम करते त्याप्रमाणेच डिजिटल वाहिनीचे काम सुरू केले तर.. अशी संकल्पना समोर येऊ लागली. याच संकल्पनेतून ‘नेटफ्लिक्स’सारखी कंपनी उदयाला आली. विविध चित्रपट, मालिका निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी करार करून त्यांच्या मालिका दाखविण्यास सुरुवात झाली. यातून डिजिटल मनोरंजन वाहिनीचा जन्म झाला. पुढे ‘नेटफ्लिक्स’ने काही नवीन निर्माते, कलाकार तयार केले जे केवळ डिजिटल माध्यमांसाठीच काम करतील. अशीच संकल्पना पुढे ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’ही घेऊन आले. या दोन्ही कंपन्या २०१६मध्ये भारतीय बाजारात दाखल झाल्या. भारतात या वाहिन्यांना आवश्यक अशी इंटरनेट जोडणी तोपर्यंत उपलब्ध होती.

या वाहिन्या मोबाइल अ‍ॅपवर, स्मार्ट टीव्हीवर, कन्सोलवर उपलब्ध आहेत. २०१५मध्ये जागतिक  पातळीवर डिजिटल माध्यमाच्या कंपन्यांमध्ये तब्बल तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली होती. याच कालावधीत भारतातही डिजिटल माध्यमाचा हा ट्रेंड सुरू झाला होता. २०१३मध्येच भारतात तब्बल २००हून अधिक डिजिटल माध्यम नवउद्योगांसाठी १८ कोटी डॉलर्सची गुंतवणूक झाली होती. यानंतरच्या दोन वर्षांत आणखी ८० कंपन्या उदयाला आल्या. या कंपन्यांच्या माध्यमातूनच या डिजिटल वाहिन्यांसाठी स्वतंत्र व्हीडिओ विकसित करण्याचे काम सुरू झाले. हल्ली डिजिटल वाहिन्यांवरील कलाकारांनाही ग्लॅमर मिळू लागले आहे. देशातील तरुणांना या कलाकारांसोबतही सेल्फी घ्यायचा असतो, यातच त्यांचे फॅन फॉलोइंग दिसून येतंय.

माध्यमाचे उत्पन्न

या माध्यमाला टीव्ही माध्यमासारखेच उत्पन्नस्रोत आहेत. या माध्यमात जाहिरातींमधून उत्पन्न मिळते. माध्यमाच्या मोफत सेवेमध्ये जाहिराती दाखविल्या जातात. या जाहिराती देणाऱ्या कंपन्यांकडून माध्यम सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना महसूल मिळत असतो. याशिवाय कंपन्यांचे विविध पॅकेजेस उपलब्ध आहेत. जसे ‘नेटफ्लिक्स’ने भारतात ५०० रुपयांपासून ते ८०० रुपयांपर्यंतची विविध पॅकेजेस ठेवली आहेत. तसेच ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’नेही ठेवली आहेत. याशिवाय एखादी मालिका विशिष्ट रक्कम भरून पाहता येऊ शकते.

२०१६मध्ये ‘नेटफ्लिक्स’चे भारतात ३५ लाख वर्गणीदार पूर्ण झाले होते. तर हेच प्रमाण २०२५मध्ये सात कोटी ५३ लाखांपर्यंत जाईल असा अंदाजही वर्तविण्यात येत आहे. हाच अंदाज सध्या भारतीय बाजारातील सोनी लिव्ह, हॉटस्टार, वेब टॉकिज, टीव्हीएफ आदी वाहिन्यांबाबतीतही बांधला जात आहे. तसेच भारतातील जाहिरातदारांचा कलही आता इंटरनेट माध्यमाकडे वळत असल्याचे आकडय़ांवरून स्पष्ट होत आहे. २०१२मध्ये जाहिरात क्षेत्राच्या एकूण खर्चापकी केवळ सहा टक्के खर्च इंटरनेट माध्यमासाठी केला जात होता. हेच प्रमाण २०१६मध्ये १३ टक्क्यांवर गेले आहे. २०२०मध्ये हे प्रमाण २५ टक्के इतके होईल असा अंदाज व्यक्त होत आहे. यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांना भविष्यात अनेक संधी उपलब्ध आहेत. या संधीचा फायदा घेण्यासाठी देशातील तसेच परदेशातील कंपन्याही उत्सुक आहेत. यामुळे येत्या काळात देशात नक्कीच ‘स्ट्रििमग युद्ध’ रंगणार.

सुरुवातीला संगणकावर उपलब्ध असलेल्या या सुविधा कालांतराने मोबाइलवरही आल्या.

* जून २०१६च्या आकडेवारीनुसार देशात ३७ कोटी ७० लाख लोक मोबाइलवर इंटरनेटचा वापर करतात.

* यातील २२ कोटी ग्राहकांकडे स्मार्टफोन आहे. यापकी १६ ते ३० वयोगटातील वापरकत्रे दिवसातील सुमारे अडीच तास या फोनच्या पडद्यासमोर असतात.

* ४५ ते ६५ वयोगटातील वापरकत्रे सुमारे दीड तास फोनच्या पडद्यासमोर असतात.

* यापकी ४० टक्के लोक गाणी ऐकण्यात आणि व्हिडीओ पाहण्यात आपला वेळ घालवत असतात.

आवडीचा आणि सवडीचा मेळ

* प्रत्येकाची आवड ही वेगळी असते. एकच मालिका घरातल्या सर्वानाच आवडते असे नाही. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या वाहिन्यांमध्ये खास तरुणांसाठी विशेष असे काहीच दिले जात नाही अशी तरुणांची भूमिका असते. तर अनेकांना प्राइम टाइम गाठणे जमत नाही. अशा सगळ्यांसाठी आवडीचा आणि सवडीचा मेळ या ‘डिजिटल’ वाहिन्यांमध्ये घालण्यात आला आहे. यामध्ये नेहमीपेक्षा वेगळ्या संकल्पना आणि विषय घेऊन तरुणांना भावेल अशा मालिका सुरू करण्यात आल्या आहेत. या मालिका दहा भागांच्या, बारा भागांच्या असतात. याचाही पुढचा टप्पा गाठत आता थेट या डिजिटल माध्यमासाठी स्वतंत्र चित्रपट निर्मितीही होऊ लागली आहे. ‘वेब टॉकिज’ या वाहिनीने शुक्रवारीच पहिला फक्त संकेतस्थळासाठी निर्मिती केलेला ‘यू, मी और घर’ हा चित्रपट प्रदíशत केला. या माध्यमाला लोकांची पसंती मिळत असून लोक आवडीने यावरील मालिका पाहू लागल्याचे वेब टॉकिजचे वीरेंद्र शहाणे यांनी नमूद केले.

* येत्या काळात भारतात इंटरनेट वापरकर्त्यांचे प्रमाण सातत्याने वाढणार असल्यामुळे हा बाजार मोठी भरारी घेईल. लोक या डिजिटल वाहिनीवरील मालिकांचा नवीन भाग कधी येतोय याची वाट पाहात असतात असेही शहाणे यांनी नमूद केले. तर या वाहिनीवरील ‘मेड इन इंडिया’ या मालिकेत काम करणारी अभिनेत्री फ्लोरा सनी हिने या माध्यमाने मला नवी ओळख मिळवून दिल्याचे सांगितले. या माध्यमावर सध्या नवीन प्रयोग होत आहेत; या प्रयोगांमधून कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळत असते. अर्थात हे माध्यम कलाकाराला आजतरी टीव्ही इतके लोकप्रिय बनवू शकत नाही. मात्र महानगरांमध्ये त्याची ओळख निर्माण करून देऊ शकते, असेही फ्लोरा म्हणाली.

* तरुणांना आपल्याशा करून घेणाऱ्या मालिका दाखविण्याच्या दृष्टीने हे माध्यम खूपच महत्त्वाची भूमिका बजावते. यासाठी खास तरुण प्रक्षकांना डोळ्यासमोर ठेवून हे माध्यम काम करत असल्याचे सोनी पिक्चर्स नेटवर्क्‍स इंडिया प्रा. लि.चे उपाध्यक्ष व प्रमुख उदय सोधी यांनी सांगितले. या माध्यमात सध्या परदेशी कंपन्या येत आहेत. या कंपन्यांची स्पर्धा होण्या इतपत हे क्षेत्र अद्याप मोठे झालेले नाही. पण परदेशी कंपन्या गुंतवणूक करत असल्यामुळे या क्षेत्रात भविष्यात नक्कीच मोठय़ा संधी असल्याचे स्पष्ट झाल्याचेही सोधी यांनी नमूद केले.

नीरज पंडित –  niraj.pandit@expressindia.com