गेल्या काही वर्षांमध्ये कलाविश्वामध्ये अनेक बदल झाले आहेत. चंदेरी दुनियेमध्ये अनेक नवोदित कलाकारांनी प्रवेश केला. यात काही स्टारकिड आहेत तर काहींनी स्वत:च्या हिमतीवर कलाविश्वात स्थान मिळवलं आहे. यामध्येच एक नाव म्हणजे इलाक्षी गुप्ता. बहुचर्चित ठरत असलेल्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटातून ती कलाविश्वात पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तिची महत्त्वाची भूमिका आहे.

बोल्ड मॉडेल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या इलाक्षीचा ‘तान्हाजी’ हा पहिलाच चित्रपट असून यात ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची सोयराबाई मोहिते यांची भूमिका साकारणार आहे. तर मराठी अभिनेता शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराज यांची व्यक्तीरेखा साकारत आहे. इतकंच नाही तर तान्हाजीनंतर ती लवकरच मराठी चिपटात पदार्पण करणार आहे. तान्हाजी चित्रपटाआधी इलाक्षीने प्रदीप सरकार दिग्दर्शित ‘कोल्ड लस्सी आणि चिकन मसाला’ या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. इलाक्षीने २०१५ साली ‘मिसेस इंडिया ग्लोब’ हा किताब मिळवली होती.

दरम्यान, ‘तान्हाजी’मधून शिवकालीन इतिहासाच्या पानांमधील तान्हाजी मालुसरे या मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगण्यात येणार आहे. यामध्ये अजय देवगण, सैफ अली खान, काजोल यांसोबतच बरेच कलाकार भूमिका साकारत आहेत. तसंच अजय देवगण प्रोडक्शनचा हा थ्रीडी चित्रपट असून त्याचा हा १०० वा चित्रपट आहे.