अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) बुधवारी अभिनेता अर्जुन रामपालची लीव्ह इन पार्टनर, मॉडेल गॅब्रीएला डेमेट्रीएड्स हिची सुमारे सहा तास चौकशी केली. सोमवारी गॅब्रीएला, रामपाल यांच्या निवासस्थानी एनसीबीने छापा घालून शोधाशोध केली होती. या कारवाईत काही प्रमाणात अमली पदार्थ हस्तगत करण्यात आल्याचा दावा एनसीबीने केला होता.

गेल्या महिन्यात एनसीबीने गॅब्रीएलाच्या भावाला लोणावळा येथून अटक केली होती. त्याच्याकडूनही काही प्रमाणात अमली पदार्थ हस्तगत केले होते. अमली पदार्थाचे सेवन, अमली पदार्थ विक्रेत्यांशी संपर्क आणि बॉलीवूडशी संबंधित व्यक्तींना अमली पदार्थाचा पुरवठा असा आरोप एनसीबीने त्याच्यावर ठेवला होता.

रविवारी चित्रपट निर्माते फिरोज नाडीयाडवाला यांच्या पत्नी शबाना सईद यांना एनसीबीने अटक केली होती. नाडीयाडवाला यांच्या जुहू येथील बंगल्यातून गांजा हस्तगत केल्याचा दावा एनसीबीने केला होता. या प्रकरणी एनसीबीने नाडीयाडवाला, रामपाल यांना समन्स जारी करून चौकशीस बोलावले आहे. गुरुवारी रामपाल एनसीबीच्या विभागीय कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता आहे.