मुंबईतील कार्यालयासंबंधी महापालिकेशी वाद झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘अच्छे दिन’ आणि भ्रष्टाचारमुक्त अभियानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ट्विट कॉमेडियन कपिल शर्माने केले होते. या ट्विटप्रकरणी आता दोन वर्षांनंतर त्याने त्याच्याच कार्यक्रमात मोदींची जाहीर माफी मागितली आहे. ‘मोदी साहब सॉरी’, म्हणत त्याने हात जोडले.

२०१६ मध्ये मुंबईत कार्यालय बांधण्यासाठी कपिलचा महापालिकेसोबत वाद झाला होता. यानंतर कपिलने मध्यरात्री मोदी यांना ट्विट करत मोदींच्या अच्छे दिन आणि भ्रष्टाचारमुक्त भारत अभियानावर प्रश्न उपस्थित केले होते. त्याच्या या ट्विटवर तेव्हा अनेकांनी आक्षेप घेतला होता.

‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटाच्या टीमने नुकतीच हजेरी लावली होती. काही दिवसांपूर्वी सर्व कलाकारांनी मोदींची भेट घेतली होती. तेव्हा मोदी माझ्याबद्दल काही म्हणाले का असा प्रश्न कपिलने राजकुमार रावला विचारला. त्यावर राजकुमारने मस्करीत उत्तर दिले की, ‘हो, नुकतंच लग्न झालेल्या एका व्यक्तीविषयी ते विचारत होते. मी त्यांना विराट कोहलीबद्दल विचारताय का असं म्हटलं. त्यावर त्यांनी तुझं नाव घेतलं आणि तुझी आठवण काढली असं तुला सांगण्यास कळवलं.’ हे ऐकून अभिनेत्री जुही चावलाने नेमकं काय घडलं असा प्रश्न विचारला. त्यावर ‘ट्विटर नाम की चीज है, इसने बडे पंगे क्रिएट किए है लाइफ मै’ (ट्विटर नावाची एक गोष्ट आहे, ज्यामुळे माझ्या आयुष्यात मोठी समस्या निर्माण झाली होती.) असं उत्तर कपिलने दिलं. कपिलने स्वत:वरच केलेल्या या विनोदामुळे सर्वजण खळखळून हसू लागले. ‘तू मध्यरात्री ट्विट करत जाऊ नकोस’, अशा शब्दांत नवज्योत सिंग सिद्धू यांनीही कपिलची खिल्ली उडवली. तेव्हा ‘मोदी साहब सॉरी’ म्हणत कपिलने कार्यक्रमात माफी मागितली.