हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ गाजविणाऱ्या पार्श्वगायकांमध्ये मोहम्मद रफी यांचं नाव आजही अग्रस्थानी घेतलं जातं. श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याचं सामर्थ्य आजही त्यांच्या आवाजात कायम आहे. बॉलिवूडमध्ये एकाहून एक सरस गाणी गाणारे रफी यांनी सुमारे २५ हजारपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. मात्र गोड गळा लाभलेल्या गायकाने केवळ गाण्याप्रती असलेल्या प्रेमापोटी कमी मानधन स्वीकारुनही चित्रपटांना त्यांच्या आवाज दिला आहे.

रफींचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी पंजाबच्या कोटला सुल्तान सिंह गावी एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात झाला. मात्र ते ‘रफीसाहेब’ याच नावाने ओळखले जातात. रफी यांनी १९८० पर्यंत संगीतक्षेत्रावर अधिराज्य गाजविलं असून आवाजाच्या या महान जादूगाराने ३१ जुलै रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मात्र ‘आज मौसम बड़ा बेईमान है’, ‘तारीफ करूं क्या उसकी’, ‘चाहूंगा मैं तुझे’, ‘अभी ना जाओ छोड़कर’ ही गाणी आजही एव्हरग्रीन म्हणून ओळखली जातात.

रफीसाहेब सुरुवातीला गावात फिरणाऱ्या फकीराची नक्कल करत असतं. येथूनच त्यांच्यात गायनाचं बीज रुजत केलं. वयाच्या १३ व्या वर्षापासून त्यांनी गायनाची सुरुवात केली. एका समारंभामध्ये के.एल.सहगल यांनी रफीसाहेबांच गाणं ऐकलं आणि त्यांनी लाहोरमध्ये एका कार्यक्रमामध्ये गाण्याची संधी दिली. त्यानंतर १९४८मध्ये रफी यांनी राजेंद्र कृष्णन यांनी लिहीलं ‘सुन सुनो आए दुनिया बालो बापूजी की अमर कहानी’ हे गाणं गायलं होतं. विशेष म्हणजे या गाण्याची लोकप्रियता पाहता तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी रफी यांनी त्यांच्या घरी आमंत्रित केलं होतं.

रफीसाहेबांनी कधीच कोणत्याही गाण्यासाठी मानधनाची अपेक्षा ठेवली नव्हती. इतकंच नाही तर त्यांनी कधीच किती मानधन देणार असा साधा प्रश्नही चित्रपटाच्या दिग्दर्शकांना किंवा निर्मात्यांना विचारला नव्हता. विशेष म्हणजे कधी कधी त्यांनी केवळ एक रुपया मानधन स्वीकारुनही चित्रपटांना आपला आवाज दिला होता. मात्र कमी मानधन घेणाऱ्या रफींची प्रत्येक गाणी सुपरहिट ठरत गेली. त्यांनी केवळ हिंदीच नाही तर मराठी, कोकणी, भोजपुरी, इंग्लिश, तेलुगु, मैथिली आणि गुजराती या भाषांमध्येही गाणी गायली आहेत.