मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते मोहन जोशी यांना करोना झाला आहे. मोहन जोशी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार मोहन यांनी काही दिवसांपूर्वीच लशीचे दोन डोस घेतले होते.

मोहन जोशी हे ‘अग्गंबाई सूनबाई’ या मालिकेचे गोव्यात चित्रीकरण करत होते. पण चित्रीकरण थांबवल्यानंतर संपूर्ण टीमसोबत ते मुंबईत परतले होते. नुकताच त्यांनी करोना चाचणी करुन घेतली आणि ती पॉझिटिव्ह आल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे.

आणखी वाचा : करीना कपूर खान पोहोचली नानावटी रुग्णालयात, काय आहे नेमकं कारण?

‘कृपया घरी राहा आणि सुरक्षित रहा. माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे’ असे त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटला स्टोरी शेअर करत सांगितले होते. त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांनी चाहत्यांना घरात सुरक्षित राहण्याची विनंती केली आहे.

राज्यात करोना संसर्ग अद्याप वाढत असला तरी, रूग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात ६० हजार २२६ रूग्णांनी करोनावर मात केली. राज्यात आजपर्यंत एकूण ४४,०७,८१८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८६.४ टक्के एवढे झाले आहे. तर, आतापर्यंत राज्यात ७५ हजार ८४९ रूग्णांचा मृत्यू झालेला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे.