ठाणे येथील मुंब्रा परिसरातील पारसीख टेकडीवर असलेल्या अभिनेता मोहनीश बहलच्या बंगल्यात शनिवारी (२२ फेब्रुवारी) एका छोट्या बाळाचा मृतदेह आढळून आला. बंगल्यातील रखवालदार आणि नोकराला सदर मृतदेह प्रथम दिसला. आपल्या बंगल्यातील तरण तलावात बालकाचा मृतदेह आढळून आल्याच्या वृत्ताने मोहनीश बहलला प्रचंड धक्का बसला. सदर बंगला मोहनीशची आई अभिनेत्री नुतनचा बंगला म्हणून परिसरात प्रसिध्द आहे. अनेक वर्षांपासून हा बंगला निर्जन अवस्थेत पडून आहे. या बंगल्यात त्याच्या बालपणीच्या आठवणी दडल्या असल्या कारणाने मोहनीशला हा बंगला विकावासा वाटत नव्हता, परंतु या धक्कादायक घटनेमुळे आता तो सदर बंगला विकण्याचा विचार करत आहे. मोहनीशने या घटनेबाबबत शोक व्यक्त करत, मुलींविषयी समाजात असलेली विचारधारा बदलण्याची विनंती लोकांना केली आहे. या प्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवालात सदर मृतदेह मुलीचा असल्याचे पुढे आले आहे.