‘कॅप्टन अमेरिका द फर्स्ट अॅव्हेंजर्स’ या सुपरहिट चित्रपटातून नावारुपास आलेल्या अभिनेत्री मॉली फिट्जराल्ड हिने आपल्या जन्मदात्या आईची चाकू मारुन हत्या केली आहे. या ३८ वर्षीय अभिनेत्रीला अमेरिकेतील कॅन्सस शहरातून पोलिसांनी अटक केली.

तिने आईची हत्या का केली?

कॅन्सस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पॅट्रीसिया टी असे तिच्या आईचे नाव होते. ती ६८ वर्षांची होती. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारात मॉलीच्या शेजाऱ्यांना एक जोरदार किंकाळी ऐकू आली. ही किंकाळी कोणाची आहे? हे जाणून घेण्यासाठी शेजारची मंडळी तिच्या घराजवळ जमले. त्यावेळी घराचा दरवाजा सताड उघडा होता. घरात गेल्यावर त्यांना रक्ताने माखलेला मॉलीच्या आईचा मृतदेह दिसला. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. दरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीत मॉलीनेच तिच्या आईची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. परंतु मॉलीने तिच्या आईची हत्या का केली? हे अद्याप पोलिसांना कळलेले नाही.

कोण आहे मॉली फिट्जराल्ड ?

मॉली फिट्जराल्ड हॉलिवूडमधील सध्याच्या चर्चीत अभिनेत्रींपैकी आहे. तिने २०१७ साली ‘द क्रिप्स’ या चित्रपटातून आपल्या सिनेकारकिर्दीची सुरुवात केली. या चित्रपटात तिने केलेल्या अभिनयाची प्रचंड स्तुती करण्यात आली होती. त्यानंतर ‘ट्रबल इज माय बिझनेस’ या चित्रपटात तिने दिलेल्या प्रणयदृश्यांमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. पुढे तिला मार्व्हलच्या ‘कॅप्टन अमेरिका द फर्स्ट अॅव्हेंजर्स’ या सुपरहिट चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.