गेल्या वर्षी करोना व्हायरसमुळे करण्यात आलेला लॉकडाउन कोणीच आयुष्यात विसरणार नाही. अनेकांनी खूप काही गमावलं, कमावलं, माणुसकी दिसून आली, चांगल्या कामात एकी सुद्धा दिसून आली. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे प्रेक्षकांचे घरबसल्या मनोरंजन करण्यासाठी बरेच सिनेमे, वेब सीरिज आल्या. त्या दरम्यान प्रदर्शित झालेल्या अनेक वेब सीरिजपैकी ‘मनी हाईस्ट’ ही वेब सीरिज विशेष गाजली. या वेब सीरिजमधील ‘Bella Ciao’ हे गाणं सुद्धा खूप लोकप्रिय झालं आणि खूप कमी वेळात सर्वांच्या पसंतीस सुद्धा उतरले.

नवीन वर्षात सर्वकाही सुरळीतपणे सुरू होईल अशी आशा जनतेने ठेवली होती, पण सुरुवातीचे काही महिने गेल्यावर पुन्हा लॉकडाउन लागला. गेल्या वर्षी जी करोनाची लाट आली ती गंभीर होतीच. पण आता ही दुसरी लाट महाभयंकर आहे आणि हे आपण सर्वजण पाहातोय. असं असूनही काही ठिकाणी गर्दी आणि मास्क हनुवटीच्या खाली आहेतच. लोकांना त्यांच्या पद्धतीनेच समजावून सांगण्यासाठी ‘कडक एंटरटेमेंट’ घेऊन आले आहे ‘Bella Ciao चं कडक मराठी व्हर्जन’.

स्वप्निल संजय मुनोत आणि अक्षय मुनोत यांच्या ‘अहमदनगर फिल्म कंपनी’ची निर्मिती असलेलं Bella Ciaoचं कडक मराठी व्हर्जन ‘कसा ला’ गाण्याची कल्पना नितिश कटारिया आणि स्वप्निल  मुनोत यांची आहे. एकंदरीत, या गाण्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात आला आहे.