नागराज मुंजुळेच्या ‘सैराट’ सिनेमा जेवढा हिट ठरला तेवढीच त्यातली सगळी गाणीही हिट ठरली. सिनेमा प्रदर्शित होऊन महिने लोटले असले तरी या सिनेमाची आणि त्यातल्या गाण्यांची क्रेझ काही कमी झाली नाही. ‘झिंग झिंग झिंगाट’ या गाण्याने तर सगळ्यांनाच वेड लावले आहे. लग्न सोहळा असो किंवा कोणती मिरवणूक या गाण्याशिवाय ना सुरुवात होते ना शेवट.
सध्या गणेशोत्सवाच्या दिवसात विसर्जनाला हे गाणे प्रत्येक मिरवणूकीत वाजताना ऐकू येते. झिंगाट गाण्याला दुसरा पर्याय अजूनतरी उपलब्ध झालेला नाहीए. सर्वसामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनाच या गाण्याचे वेड लागले आहे. माधुरी दीक्षित, रितेश देशमुख, अक्षय कुमार यांसारखे कलाकारही या गाण्यावर मनमुराद नाचले आहेत. सध्या या गाण्यावर गणपती मिरवणूकीत अभिनेत्री मोनिका बेदीही मनोसोक्त नाचताना दिसत आहे. तिने तिच्या फेसबूक अकाऊंटवरुन ‘झिंगाट’ गाण्यावर नाचतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
काही दिवसांपूर्वी काही फॅन्सनी सैराटपासून प्रेरणा घेत भन्नाट प्रकारही केले आहेत. कोणी आपली बाईक सैराटच्या पोस्टरने रंगवून घेतली तर कोणी हा सिनेमा पाहण्याचा विक्रमच मोडून टाकला. गणपतीच्या सजावटीसाठी देखील आर्ची परश्याचे पुतळे बनवले गेले. काहींनी तर याहून पुढे जात परशा आणि आर्चीच्या वेशभूषेतलेच गणपती बनवले. काही दिवसांपूर्वी अशाच एका सैराट प्रेमीने पोळा सणाच्या दिवशी आपल्या बैलालाही तसाच रंगवला. बैल पोळ्याला बळीराजा आपल्या बैलांना आंघोळ घालून, रंगरंगोटी करून, झूल पांघरून सजवतो. तशी परंपराच आहे. झूल पांघरून, रंगरंगोटी केलेल्या बैलाची पूजा करून मिरवणूक काढली जाते. अशा एका बैलाचा फोटा व्हॉट्स अॅप, फेसबुकवर व्हायरल झाला होता. या बैलांच्या मालकाने ‘सैराट झालं जी’ आणि ‘झिंगाट’ या गाण्याची काही अक्षरे आपल्या बैलांच्या पाठीवर लिहिली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 11, 2016 7:47 pm