नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ने तिकीटबारीवर ८० कोटी रुपयांची कमाई केली. मराठी चित्रपटांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. दोन नवीन कलाकारांना घेऊन केलेल्या या चित्रपटाने संपूर्ण मे महिनाभर राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये तळ ठोकला होता. त्यामुळे पहिल्यांदाच त्या महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या जवळपास प्रत्येक मराठी चित्रपटाला पुढच्या तारखा घ्याव्या लागल्या होत्या. याचा परिणाम म्हणून की काय जून महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांची एकच भाऊगर्दी झाली आहे. आणि दर आठवडय़ात दोन-तीन मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यावाचून गत्यंतर उरलेले नाही.
संपूर्ण मे महिन्यात प्रत्येक चित्रपटगृहांतून प्रेक्षकांवर ‘सैराट’चंच झिंगाट चढलं होतं. त्यामुळे साहजिकच या चित्रपटाला मिळणाऱ्या लक्षणीय प्रतिसादात आपला चित्रपट वाहून जाऊ नये म्हणून निर्माते-दिग्दर्शकांनी धाडसी निर्णय घेत आपले चित्रपट पुढे ढकलले. यात ‘युथ’, ‘चीटर’, ‘किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी’ या चित्रपटांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. अजूनही ‘सैराट’चे शो चित्रपटगृहांमधून दाखवले जात आहेत. त्याचबरोबर जून महिन्यात आधीच प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांबरोबर आधीच्या चित्रपटांचीही भर पडली आहे. त्यामुळे जून महिन्याच्या आठवडय़ात प्रत्येकी दोन ते चार मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. जूनच्या पहिल्या आठवडय़ात ‘युथ’ आणि लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘लालबागची राणी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. दुसऱ्या आठवडय़ात चार मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. अजय फणसेकर दिग्दर्शित ‘चीटर’, ‘दुनिया गेली तेल लावत’, ‘२० म्हंजे २०’ आणि प्रमोद गोरे निर्मित ‘बरड’ हे चार चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. १७ जूनच्या शुक्रवारीही कांचन अधिकारी दिग्दर्शित ‘किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी’ या पुढे ढकललेल्या चित्रपटाबरोबर तेजस्विनी लोणारी हिची मुख्य भूमिका असलेला ‘बर्नी’ आणि ‘पिंडदान’ हे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तर चौथ्या आठवडय़ातही तीन मोठे आणि महत्त्वाचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. भगवानदादा यांच्या आयुष्यावर आधारित मंगेश देसाई आणि विद्या बालन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘एक अलबेला’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, मुक्ता बर्वेची वेगळी भूमिका असलेला ‘गणवेश’ आणि ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ हा चित्रपटही त्याच वेळी प्रदर्शित होणार आहे. एरवीही एकाच तारखेला पाच ते सात चित्रपट प्रदर्शित होण्याचा प्रकार मराठी चित्रपटांसाठी नवीन नाही. मात्र एकाच महिन्यात प्रत्येक शुक्रवारी एवढे चित्रपट प्रदर्शित झाल्याने त्याचा व्यवसायावरही निश्चित परिणाम होणार आहे.