नव्या वर्षांची नवी सुरुवात ‘लोकमान्य-एक युगपुरुष’ या चित्रपटाने होणार आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडिया साइट्सवरून उदंड प्रतिसाद मिळतो आहे. १५ डिसेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर यूटय़ूबवर प्रदर्शित झाला तेव्हा दीड दिवसांत दीड लाख हिट्स त्याला मिळाल्या होत्या. आठवडय़ाभरात विविध सोशल मीडिया साइट्सच्या माध्यमातून १२ लाख लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचला आहे. ब्रिटिशांशी लढा देताना लोकमान्य टिळकांची भिस्त ही तरुणांवर होती. आज तीच तरुण पिढी सोशल मीडियाद्वारे लोकमान्यांच्या विचारांचे स्वागत करते आहे हे पाहून आनंद होतो, अशी भावना दिग्दर्शक ओम राऊत यांनी ‘वृत्तांत’शी बोलताना व्यक्त केली. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, अशी गगनभेदी गर्जना करणारा लोकमान्य टिळकांसारखा नेता स्वातंत्र्योत्तर काळातील आजच्या पिढीने अनुभवलेलाच नाही. आज टिळक, गांधी, फुले, आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांमुळे, विचारवंतांमुळे आपल्याला ‘स्वराज्य’ मिळाले आहे. मात्र, ते आपल्याला पुढे नेता आलेले नाही. आज आपल्याला ‘सुराज्या’ची गरज आहे आणि त्यासाठी लोकमान्यांनी मांडलेले विचार आजच्या पिढीला मार्गदर्शक ठरतील, या विश्वासानेच हा चित्रपट दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतल्याचे ओम राऊत यांनी सांगितले. नीना राऊत यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे यांनी ‘लोकमान्यां’ची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाबद्दल सुबोधचा ‘लोकमान्यां’च्या भूमिकेतील लुकपासून सगळ्याच गोष्टी गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या होत्या. शनिवारवाडय़ात पहिल्यांदाच ‘लोकमान्यां’च्या वेशातील सुबोध लोकांसमोर आला. तेव्हाही त्याला तितकाच उत्स्फू र्त प्रतिसाद मिळाला आणि सोशल मीडियावर तर चित्रपटाच्या ट्रेलरलाही उदंड प्रतिसाद मिळत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
‘लोकमान्यां’ची भूमिका सुबोधच करू शकतो, यावर आपला ठाम विश्वास होता. त्यामुळे त्याला लोक या भूमिकेत शंभर टक्के स्वीकारणार ही खात्री होती. पण, खुद्द सुबोध याबद्दल साशंक होता. पहिल्या काही ट्रायल केल्यानंतर त्यालाही हळूहळू विश्वास वाटू लागला. या चित्रपटाला तरुणांचा प्रतिसाद मिळतोय त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण लोकमान्य टिळकांच्या विचारांमध्येच आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी नुसत्या विचारांवर थांबणे उपयोगी नाही. त्यासाठी प्रत्यक्ष लढा द्यायला हवा, हे त्यांनी तरुणांना पटवून दिले. त्यांना स्वातंत्र्यलढय़ात सहभागी करून घेतले. लोकमान्य नेहमी म्हणत, ‘‘स्वातंत्र्योत्तर काळातील पिढीने स्वत:च्या प्रगतीबरोबरच देशाच्या प्रगतीचाही विचार केला पाहिजे. देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले तरच त्यांची पिढी सुखी होईल आणि देश पुढे जाईल.’’ त्यांचा हा विचार आजच्या पिढीने गांभीर्याने समजून घेऊन कृतीत आणला पाहिजे, हाच विचार चित्रपटातूनही मांडला असल्याचे राऊत यांनी सांगितले.