युद्ध मग ते जागतिक असो की स्थानिक ते कायमच दृक् श्राव्य माध्यमांसाठी आवडीचा विषय राहिले आहे. अगदी पहिल्या महायुद्धाला शंभर वर्ष पूर्ण होत असतानादेखील त्यातील अनेक कथानकं आजही खुणावत राहतात. मात्र युद्धभूमीवरचं प्रत्यक्ष युद्ध ही बाब रंजक असल्यामुळे अनेकदा त्यावरच युद्धपटांचं लक्ष केंद्रित असतं. काही अपवाद सोडल्यास त्यामागील घटनांना सामावून घेण्याचा प्रकार झाला आहे. वेबसीरिजच्या माध्यमात तर असं काही मांडण्यासाठी प्रचंड वाव असतो. आणि ही संधी ‘मोरोक्को – लव्ह इन टाइम्स ऑफ वॉर’ या वेबसीरिजने अगदी नेमकी उचलली आहे, हे या वेबसीरिजचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़. एखादी प्रदीर्घ कादंबरी म्हणावी अशी ही वेबसीरिज स्पॅनिश-आफ्रिकन युद्धाच्या पाश्र्वभूमीवर अनेक प्रेमकथा रंगवते. युद्धाच्या दरम्यान सत्तास्थानातील हेवेदावे, चढाओढी, लष्करातील अंतर्गत तिढे आणि त्याच वेळी रंगणारी प्रेमकथा या सर्वाची अगदी यथास्थित मांडणी करते. त्यामुळेच तिचे स्वरूप केवळ प्रेमकथा न राहता युद्धापलीकडच्या एका वास्तवाची मांडणी करणारी कथा असं होतं.

ही सारी कथा घडते ती मेलियामध्ये. स्पॅनिश-मोरोक्कन युद्धामध्ये स्पेनच्या राणीच्या आदेशानुसार काही परिचारिका मेलियामध्ये जातात आणि तेथे युद्धातील जखमी सैनिकांसाठी इस्पितळ उभे करतात. त्या परिचारिकांपैकी काहींना स्वत:चा एक इतिहास असतो आणि तो स्पॅनिश सैन्यदलाशी निगडित असतो. एक परिचारिका तर केवळ आपल्या वाग्दत वराच्या आणि भावाच्या शोधात (दोघेही आघाडीवर लढत असतात आणि कैक महिन्यांत त्यांचा कसलाही संपर्क नसतो) आलेली असते. त्यातून मग अनेक प्रसंगांची मालिका सुरू होते. जरी थेट राणीच्या आशीर्वादाने हे इस्पितळ सुरू झाले असले तरी मेलियामधील तैनात वैद्यकीय फौजेला हे खटकत असते. अर्थातच तेथील उच्चाधिकारी आणि या नव्या इस्पितळाचे सर्वाधिकारी यांच्यात एक सुप्त लढाई सुरू असते. त्यातच राणीच्या इस्पितळाला मिळणाऱ्या सुविधा, त्या इस्पितळातील कर्मचाऱ्यांशी निगडित घटनांमध्ये राणीचा थेट हस्तक्षेप यामुळे हा तिढा वाढत जातो. आणि त्याच वेळी काही प्रेमकथा खुलत असतात काही बिघडत असतात. इस्पितळात अशा अनेक घटना दिवसागणिक घडत असतात. अशा अनेक घटना जरी घडत असल्या तरी या सर्वाचा उद्देश एकच असतो तो म्हणजे देशासाठी काम करत राहणे. ही जिद्द कायम असल्यामुळे कथानक अनेक टप्प्यावर वळणं घेत राहतं. कधी ते देशप्रेमाच्या एका टोकाला पोहचतं तर कधी प्रेमालापाच्या. अशा वेळी प्रेमकथेतला चार्म तर हरवायचा नाही आणि युद्धाशी निगडित थरार, उत्सुकता टिकवून ठेवायची अशी दुहेरी जबाबदारी सिरीजकर्त्यांवर असते.

एकंदरीत कथेचे चित्रण एका मर्यादित परिघामध्ये म्हणजे त्या इस्पितळात घडत असले तरी गरजेनुसार ते थेट युद्ध आघाडीपर्यंतदेखील जात असते. त्यामुळे केवळ एकाच मर्यादित रचनेत चित्रीकरण करायला हवं असे बंधन मुळातच दिग्दर्शकाने स्वत:वर लादून घेतलेले नाही. तरीदेखील बहुतांश भाग हा इस्पितळातच घडतो. मात्र त्याचा वापर प्रभावीपणे करून घेतल्यामुळे ते फारसे कंटाळवाणेदेखील ठरत नाही. कारण येथे केवळ रुग्णांची अगतिकता दाखवण्यावर भर दिलेला नाही. तर त्या रचनेचे महत्त्व ठसवण्यावर सारं लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे गरज पडल्यास थेट युद्ध आघाडीच्या जवळच एखादे तात्पुरते इस्पितळ तयार करावे हा प्रयोग करण्यासदेखील येथील अधिकारी आणि परिचारिका तयार असतात. आणि तसा प्रयोग ते करतातदेखील. इतकेच नाही तर त्याच इस्पितळातील जखमींमुळे काही जखमी युद्धकैद्यांसाठी मोहिम काढली जाते.

एरवी युद्धकथा वाचायला रम्य असल्या तरी त्या पडद्यावर मांडणे अनेकदा कठीण असते. कारण एकतर तो काळ उभा करायचा असतो आणि त्याचबरोबर तुम्हाला त्या काळातले जे कथानक मांडायचे आहे ते प्रभावी करायचे असते. या दोन्ही आघाडीवर ही वेबसीरिज चांगलीच प्रभावी ठरते. उणीव इतकीच की अतिलांबीचे (म्हणजे एक तास पंधरा मिनिटे) काही भाग हे कथानक कधी कधी कंटाळवाणे करतात. तरीदेखील सैन्यदलातील अधिकाऱ्याच्या घरचे वातावरण, मेलियामधील सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास, मात्र त्याचवेळी सुरु असणारा भ्रष्टाचार, लष्करातील कडक शिस्तीमुळे ओढवलेले अनावस्था प्रसंग अशा काही प्रसंगामधून कथानकातील नाविन्य टिकून राहते.

त्यामुळे मूळ गाभ्याला धक्का बसत नाही. परिचारिका हा केवळ एक छानछान पेशा नसून तो जेव्हा युद्धभूमीशी जोडला जातो तेव्हा त्याला अनेक पदर निर्माण होतात. तुमच्या शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही क्षमतांचा कस त्यामध्ये लागतो. दुसरीकडे हा सारा प्रकार कडक शिस्तीची सवय असलेल्या सैन्यदलाशीच निगडित असल्यामुळे तर काही बाबी आणखीनच कठीण होतात. त्यातच जर प्रेम या संकल्पनेने शिरकाव केला तर मग आणखीनच तिढा निर्माण होतो. हा तिढा मांडण्यात ही वेबसीरिज नक्कीच यशस्वी झाली आहे.

  • मोरोक्को – लव्ह इन टाइम्स ऑफ वॉर
  • सीझन पहिला
  • ऑनलाइन अ‍ॅप – नेटफ्लिक्स