|| भक्ती परब

प्रामुख्याने लेखिकांनी लिहिलेले चित्रपट कौतुकास पात्र ठरत असून ते बॉक्स ऑफिसवरही यशस्वी ठरत आहेत. या लेखिकांनी आजच्या प्रेक्षकाची नस अचूक ओळखली आहे. तसेच प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत कसं आणायचं, हे कसबही त्यांच्याकडे आहे. यातीलच काही लेखिकांशी प्रत्यक्ष बोलून त्यांना हा बदल कसा वाटतोय, त्यांचं मत काय आहे ते  जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

गेल्या चार-पाच वर्षांमध्ये भारतीय चित्रपटांतील प्रभावी पटकथांनी लक्ष वेधून घेतले आहे. प्रेक्षकांना या नव्या ‘चित्र’गोष्टी आवडू लागल्या आहेत. चित्रपटसृष्टीचा चेहरा हळूहळू बदलतोय. आता कौटुंबिक नाटय़, लग्न सोहळ्याची गोष्ट, त्याच त्याच प्रेमकथा जिथे एक मुलगा-मुलगी भेटतात आणि प्रेम सफल होण्यासाठी संघर्ष करतात, अशा ठोकळेबाज गोष्टी मागे पडल्या आहेत. त्याची जागा वास्तववादी कथांनी घेतली आहे. आजच्या जगण्याशी भिडताना सापडलेल्या सुखाच्या निखळ आनंदाने घेतली आहे. वास्तव मांडतानाही स्वप्ननगरीचं कुतूहल जागं ठेवलं आहे. ‘पिकू ’ चित्रपटापासून ते अलीकडे आलेल्या ‘बधाई हो’, ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ आणि ‘गल्ली बॉय’ चित्रपटापर्यंतचा आढावा घेतल्यास असं दिसून आलं आहे.

एक चमकदार संकल्पना, मग गोष्ट आणि त्यानंतर विस्तार करून लिहिली जाणारी पटकथा. चित्रपटाची इमारत याच पटकथेच्या भक्कम पायावर उभी असते. आपल्या चित्रपट लेखनाविषयी जुही चतुर्वेदी म्हणाल्या, लेखन ही योग्य तो वेळ घेऊन व्यक्त होण्याची प्रक्रिया आहे. कुठली तरी चौकट घेऊन ती तोडा-फोडा बदल घडवा, असं करण्यापेक्षा नवं काही तरी निर्माण करण्यावर माझा विश्वास आहे. आयुष्य हीच एक पटकथा आहे, असं त्या मानतात. खरं तर ‘विकी डोनर’ या चित्रपटाने अभिनेता आयुष्मान खुराणाला वेगळी ओळख मिळवून दिली. तसेच त्या चित्रपटाच्या कथेनेही विचार करायला भाग पाडले. जुही चतुर्वेदी यांनी २००२ मध्ये ‘विकी डोनर’ चित्रपटाची कथा लिहून एक वेगळी उंची गाठली. त्यांच्या प्रभावी पटकथेने हे लक्षातही आलं नाही की त्यांची ती पहिली कथा होती. त्यानंतर त्यांनी ‘पिकू’, ‘ऑक्टोबर’सारखे विषयही दिले. आता त्या लवकरच ‘द स्काय इज पिंक’ चित्रपटातून भेटणार आहेत.

‘मुझे मेरी लाइफ पार्टनर चाहिए..’

अभिषेक बच्चन आणि तापसी पन्नूमधील तो प्रसंग आणि एकूणच कनिका धिल्लोन हिने लिहिलेल्या ‘मनमर्जिया’ची गोष्ट नवा विचार देऊ न गेली. अभिषेक बच्चन, विकी कौशल आणि तापसीच्या व्यक्तिरेखांनी प्रेमकथेची कालसुसंगत दृष्टी दिली.

दिग्दर्शन आणि तितक्याच ताकदीने लेखकपण मिरवणारी रीमा कागती म्हणते, तुम्ही लेखिका आहात की लेखक याचं चित्रपटसृष्टीला काही देणंघेणं नाही, तुम्ही प्रभावीपणे लिहू शकता की नाही, हेच पाहिलं जातं. ‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’ चित्रपटापासून तिचा लेखन-दिग्दर्शनाचा प्रवास सुरू झाला. तिने काही स्वतंत्रपणे तर काही चित्रपटाचं झोया अख्तरबरोबर सहलेखन केलं. ‘रॉक ऑन’, ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’, ‘तलाश’, ‘बॉम्बे टॉकीज’, ‘दिल धडकने दो’, ‘गल्ली बॉय’ अशा चित्रपटांच्या नावांवरूनच तिच्या लेखणीच्या वेगळेपणाची प्रचीती येते. झोया अख्तर आणि रीमा कागती यांनी व्यक्तिरेखा आपल्याशा वाटतील यावर नेहमीच भर दिला. त्यांनी लिहिलेल्या चित्रपटांमध्ये सर्व व्यक्तिरेखा त्यांच्या त्यांच्या स्वभाववैशिष्टय़ांमुळे उठून दिसतात.

जास्तीत जास्त लेखिका लिहित्या झाल्या तर इतर लेखिकांसाठीही ती संधीची वाट निर्माण होईल. एक चांगलं सुरक्षित वातावरण तयार होईल. त्यामुळे स्त्रिया फक्त अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती आणि लेखन यापलीकडे जाऊ न छायाचित्रणकार आणि संकलकसुद्धा होतील, असा विश्वास झोया अख्तरने व्यक्त केला.

‘दोघी’ चित्रपट ते अलीकडे आलेल्या ‘वेलकम होम’ चित्रपटापर्यंत नानाविध विषय देणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि लेखिका सुमित्रा भावे म्हणतात, आताच्या लेखिकांचे चित्रपट मला खूप आवडले. मध्यमवर्गाच्या साध्या साध्या भावनांची दखल यात घेतली गेली. खरोखर साधी माणसं जी जगत असतात, एकमेकांच्या नात्यामध्ये जे अनुभवत असतात. ते अलीकडे चित्रपटांमध्ये खूप चांगल्या प्रकारे यायला लागले आहे. अशा चित्रपटांमध्ये फार हिंसा नसते, लैंगिक भडकपणा नसतो, अतिशय नाजुकपणाने या कथा लिहिल्या जातात. ते मला आवडतं. जास्तीत जास्त लेखिका पटकथालेखन करायला लागल्या आहेत, हा बदल स्वागतार्ह असल्याचं त्यांनी सांगितलं.

‘बदलापूर’ आणि गेल्या वर्षी आलेल्या ‘अंधाधून’ चित्रपटाचं सहलेखन पूजा सुरती यांनी केलं होतं. २०१५ मध्येच आलेल्या ‘डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी’ चित्रपटाचे सहलेखन करणाऱ्या ऊर्मी जुवेकर यांनी ‘शरारत’ चित्रपटापासून लेखनाला सुरुवात केली. आगामी ‘संदीप और पिंकी फरार’ चित्रपटही त्यांच्या लेखणीतून उतरला आहे. या बदललेल्या चित्रपट प्रवाहाविषयी त्या म्हणाल्या, एको दिवसात अचानकपणे सगळं बदलतंय, असं म्हणणं योग्य नाही. कारण स्त्रिया सातत्याने लेखन करत आहेत. जशी विविध माध्यमं येतात, तसतसे ते बदल होत असतात. मला यात काही वेगळं वाटत नाही. एकीकडे स्त्रियांचं लेखन नावाजलं जातं आहे. तशीच काही आव्हानंसुद्धा आहेत. हा लेखनाच्या दृष्टीने चांगला काळ असला तरी त्याचबरोबर कठीण काळही आहे. विविध माध्यमे वाढल्यामुळे आशयाचं व्यावसायिकीकरण होतं आहे. स्त्रियांनी आता लेखनाबरोबरच या व्यवसायातील मार्केटिंगसारख्या निर्णायक जागांवर दिसलं पाहिजे, असं मत ऊर्मी यांनी मांडलं.

‘मार्गारिटा विथ स्ट्रॉ’, ‘हमारी अधुरी कहानी’, ‘शानदार’, ‘फिलौरी’, ‘अँग्री इंडियन गॉडेसेस’, ‘जुगनी’, ‘साला खडूस’, ‘नीरजा’, ‘कपूर अँड सन्स’, ‘निल बाटे सन्नाटा’, ‘पाच्र्ड’, ‘डिअर जिंदगी’, ‘करीब करीब सिंगल’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या गेल्या पाच वर्षांतील चित्रगोष्टी लिहिणारी लेखणीही लेखिकांचीच होती. यातील काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर समाधानकारक कामगिरी केली तर काही त्यांच्या विषयांमुळे चर्चेत राहिले. गौरी शिंदे, मेघना गुलजार, झोया अख्तर, नंदिता दास, अश्विनी अय्यर तिवारी यांनी लेखिका आणि दिग्दर्शिका म्हणून चित्रपटांना वेगळा आयाम दिला. नेहमीच्या ठोकळेबाज कथांमधून चित्रपटाला बाहेर काढून माणसांची गोष्ट केले. त्याचाही परिणाम दिसून आला.

‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटातून लेस्बियनची कथा सांगणारी गझल धालीवाल आणि उतारवयात मातृत्व अनुभवताना स्त्रीची होणारी घालमेल व्यक्त करणाऱ्या ‘बधाई हो’ चित्रपटाच्या लेखिका ज्योती कपूर यांच्यासारख्या अनेक लेखिका अधिकाधिक धाडसी विषय घेऊन चित्रपट करीत आहेत. खरं तर जुही चतुर्वेदी, ज्योती कपूर, कनिका धिल्लोन, गझल धालीवाल यांच्या लेखनावर विश्वास ठेवून वरुण धवन, आयुष्मान खुराना, राजकुमार राव, नवाजुद्दीन सिद्दिकी, तापसी पन्नू, बनिता संधू, सोनम कपूर यांनी स्वत:तील कलाकाराला अजमावून पाहिलं. त्यांना या चित्रपटांनी आव्हान दिलं आणि ते वेगळं काही करू शकतात, हा विश्वास दिला. म्हणूनच २०१८ मध्ये ‘सुई धागा’ आणि ‘ऑक्टोबर’ असे दोन चित्रपट एकाच वर्षी केल्यावर ‘ऑक्टोबर’ या चित्रपटासाठी नामांकन मिळायला हवं, असं वरुणला वाटतं. कारण हा चित्रपट त्याच्यासाठी खूप खास होता. ‘बधाई हो’च्या लेखिका ज्योती कपूर यांच्या मते, लेखिका सातत्याने लेखन करत आल्या आहेत, पण त्या वेळी त्यांना संधी मिळाली नव्हती. आता अधिक संधी आहेत. एक काळ असा होता की, चित्रपटामध्ये स्त्री व्यक्तिरेखांना स्वत:चं काही म्हणणं नव्हतं. त्या असून नसल्यासारख्याच असायच्या. अलीकडच्या चित्रपटांमध्ये प्रत्येक व्यक्तिरेखाला गोष्टीनुसार स्वतंत्र स्थान मिळतं. मी लेखक आणि लेखिका असा भेद मानत नाही; परंतु लेखिकांच्या लेखणीतलं वेगळेपण नक्कीच अलीकडे चित्रपटांतून दिसतं आहे. लेखकांसाठी खूप चांगला काळ असल्याचं त्यांनी सांगितलं. कुठल्याही विषयावर गोष्ट आता तुम्ही लिहू शकता, शहरातली आणि छोटय़ा शहरातलीसुद्धा. आता चांगली गोष्ट टिकून राहणार आहे, भाषा वगैरे यांसारखे कुठलेच अडथळे राहणार नाहीत. मी पत्रकारितेपासून सुरुवात केल्यामुळे लोकांमध्ये मिसळायला आवडतं. मला भेटलेल्या खऱ्या माणसांची गोष्ट मला लिहावीशी वाटते, असं ज्योती यांनी सांगितलं. त्यांचा ‘गुड न्यूज’ नावाचा चित्रपटही या वर्षांच्या शेवटी येणार आहे.

२००४ पासून चित्रपट लेखनात मनीषा कोर्डे यांचीही वेगळी ओळख आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी त्यांनी लेखन केलंय. त्या या बदलाकडे सकारात्मकपणे बघतात. त्यांच्या मते विविध वयोगटांतील लेखकांनी जास्तीत जास्त लिहिलं पाहिजे. तर ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘चि व चि.सौ.कां.’ या चित्रपटांच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णीच्या मते, आधी चित्रपटाचं माध्यम पुरुषप्रधान होतं, पण आता स्त्रियांनाही चांगली संधी मिळू लागली आहे. अनेक लेखिका या क्षेत्रात येऊन याकडे करिअर म्हणून पाहतायेत हीसुद्धा चांगली गोष्ट आहे. पण आता ही नवलाईची गोष्ट राहिलेली नाही. कारण स्त्री लेखिका, दिग्दर्शिका, निर्माती अशा सगळ्या भूमिका निभावू शकते, हे समाजमान्य झालं आहे. सध्या मधुगंधा कुलकर्णी यांचे दोन चित्रपट लिहून झाले असून त्या एका हिंदी चित्रपटाचं लेखनही करणार आहेत.

मराठीमध्ये लेखिका रोहिणी निनावे यांच्या ‘हृदयांतर’ चित्रपटापासूनचा आढावा घेतला तरी इरावती कर्णिक, मनस्विनी लता रवींद्र, मधुगंधा कुलकर्णी, आदिती मोघे, देवश्री शिवडेकर अशा लेखिकांनी मराठी चित्रपटांच्या लेखनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली असल्याचे दिसते. आगामी ‘झोया फॅक्टर’, ‘मेंटल है क्या’, ‘गुड न्यूज’, ‘द स्काय इज पिंक’, ‘छपाक’, ‘पंगा’ अशा चित्रपटांतून लेखिकांची लेखणी प्रेक्षकांसाठी सज्ज झालेली आहे. एकूणच भव्यदिव्य चित्रपटांची दुनिया ते खरीखरी माणसांची गोष्ट अशा या चित्रपटसृष्टीच्या बदलत्या प्रवाहाला लेखिकांनी दिलेला नवा ‘नजरिया’ विशेष उल्लेखनीय ठरला आहे.

समाज प्रगल्भ होईल..

स्त्रीचं व्यक्तिमत्त्व, तिचा सांस्कृतिक अनुभव यातून विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा कथांमधून येतात. स्त्रिया त्यांच्या जगण्याकडे लिहिताना प्रामाणिकपणे बघतील. फक्त पैसे मिळवण्याचा व्यवसाय म्हणून बघणार नाहीत. कथानकात माणूसपणा आणावा, माणूसपणाची कदर करावी या दृष्टीने त्या लिहितात, ते चांगलं आहे असं मला वाटतं. त्यातूनच आपला समाज प्रगल्भ होईल. लेखिकांकडून माध्यमाचासुद्धा आदर केला जाईल असं मला वाटतं. त्या खरोखर माणसांची कथा लिहितील. इतकी र्वष हा उद्योग पुरुषप्रधान होता आणि बऱ्याच प्रमाणात अजूनही आहे. त्यामुळे काही गोष्टींविषयी समाजातील जवळजवळ निम्या वर्गाचा दृष्टिकोन काय आहे, तो मांडलाच जात नव्हता. पण आता स्त्रियांचा दृष्टिकोन त्यांच्याच नजरेतून मांडला गेला तर त्याचा समाजाला खूप फायदा होईल असं मला वाटतं.

-ज्येष्ठ दिग्दर्शिका, लेखिका सुमित्रा भावे

प्रेक्षकांचा चित्रपट पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे. नवा विषय स्वीकारण्यासाठी ते तयार असतात. ८० ते ९० च्या काळात मसाला चित्रपट आणि तद्दन व्यावसायिक चित्रपट चांगले चालायचे. गेल्या दहा-बारा वर्षांपासून लेखिकांचे लिहिण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्या या माध्यमामध्ये नवेपणा घेऊ न आल्या आहेत, नव्या गोष्टी घेऊ न आलेल्या आहेत. ‘बधाई हो’सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करतात, तेव्हा खूप छान वाटते. कारण अशा चित्रपटांसाठीही एक वेगळं मार्केट खुलं झालं आहे.    – कोमल नाहटा, चित्रपट व्यापार विश्लेषक आणि समीक्षक